सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील. सेनगांव तालुक्यातील आडोळ येथील शेतकऱ्याचे रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर व गुरांचा गोठ्याचे कुशल बिलावर स्वाक्षरी देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मोहन जाधव यांना दि.१५ एप्रिल मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ५ हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सेनगाव शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौक येथील भाड्याच्या खोलीत रंगेहात अटक करण्यात आली असुन सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती.या घटनेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वटकळी व आडोळ ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी पदी मोहन जाधव हे कार्यरत आहेत.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर व गुरांचा गोठा यांचे काम पूर्णत्वास झाले असून त्यांचे कुशल बिल काढण्यासाठी लाभार्थी हा ग्रामविकास अधिकारी मोहन जाधव यांच्याकडे कुशल बिलावर स्वाक्षरी घेण्यासाठी गेले असता सदर ग्रामविकास अधिकारी मोहन जाधव यांनी तुम्हाला तुमच्या बिलावर माझी स्वाक्षरी हवी असेल तर मला पाच हजार रुपये द्यावेच लागतील अशी लाचेची मागणी आरोपीकडून करण्यात आली परंतु लाभार्थी यांना ग्रामविकास अधिकारी यांना लाच देणे योग्य वाटत नसल्याकारणाने त्यांनी सदर प्रकारची तक्रार हिंगोली लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय यांच्याकडे केली असता सदर केलेली तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून पडताळणी करून आज दि.१५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सेनगाव शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौक परिसरात ग्रामविकास अधिकारी यांच्या भाड्याच्या खोलीच्या परिसरात लाचलुचपत विभाग हिंगोली यांनी सापळा रचून आरोपी ग्रामविकास अधिकारी मोहन जाधव यांना ५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याने सेनगांव तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असल्याचे पहावयास मिळाले.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेड पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये लाचलुचपत विभाग हिंगोली पोलीस उपाधीक्षक विकास घनवट,पोलीस निरीक्षक अंकुशकर,पोलीस हवालदार फुफाटे,मंडलिक,वरणे,शिंदे,चालक अकबर शेख यांचा पथकात समावेश होता.जिल्ह्यात शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शासकीय काम करण्यासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी हिंगोली लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभाग हिंगोली उपविभागीय पोलीस अधिक्षक विकास घनवट यांनी केले आहे.