महाराणाजी, शंभूराजे, अहिल्यामाई अखंड ऊर्जास्रोत -- लक्ष्मणराव पाटील.
एरंडोल प्रतिनिधी --
एरंडोल -- तालुक्यातील तळई गावात मे महिन्यातील ऐतिहासिक दिवसांचे औचित्य साधून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी, शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या संयुक्तिक जयंतीच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक यशवंत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले की, महापुरुषांच्या जयंत्या फक्त विशिष्ट समूहांनी साजऱ्या न करता गाव पातळीवर साजऱ्या झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही असे प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याची भावना व्यक्त केली. तदनंतर संयुक्तीक जयंतीच्या निमित्ताने शालेय स्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती त्यामधील गुणवंतांना रोख बक्षिसे व मेडल देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक आणि मान्यवरांना स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लक्ष्मणराव पाटील यांनी महाराणा प्रतापसिंहजी, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्याग, समर्पण, आत्मसन्मान, सचोटी, दुर्दम्य ईच्छाशक्ती, स्वाभिमान या गुणांच्या बळावर या सर्व महान विभूतींनी आपले कार्यकर्तृत्व गाजवले तसेच अखंड प्रेरणादायी इतिहास निर्माण केला. आजच्या कालावधीत आपण या थोर महात्म्यांच्या जीवनातून हा बोध घ्यावा की आपण एकटे असलो तरी चालेल परंतु स्वाभिमानासाठी लढलं पाहिजे, त्याग आणि बलिदानाशिवाय स्वातंत्र्य मिळवता येत नाही, सुशासन आणि लोकोपयोगी राज्यकारभार करता येतो त्यासाठी राज्यात न्याय व्यवस्था असली पाहिजे. हा केवळ इतिहास नसून जगण्याची प्रेरणा म्हणून जर बघितलं तर जीवनात आमुलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांनी आयोजकांची स्तुती केली तसेच राजेशाही व्यवस्थेमधील आदर्श समजून घेऊन लोकशाही यशस्वी करता येऊ शकते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य भागवत पाटील, तळईचे सरपंच भाईदास मोरे यांच्यासह सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन, धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राजेंद्र वाघ, गोपाल पाटील, गोरख देशमुख, निलेश पवार हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तसेच यशस्वीतेसाठी आदरणीय प्रकाश तामस्वरे सर, यशवंत पाटील, सत्यवान राजपूत तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी तळई यांनी परिश्रम घेतले.