वडाळा महादेव (प्रतिनिधी)
काव्यगंध साहित्य मंचाचे राज्यस्तरीय दुसरे कवी संमेलन शांती कमल हॉटेल शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले. या कवीसंमेलनात विशेष उपस्थिती म्हणून मराठी साहित्यिक गझलकार रज्जाक शेख यांचा शाल ,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन साहित्यिक योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक ॲड.अक्षशिला शिंदे,डॉ.नवनाथ शिंदे,उद्योजक बाबर,अर्जुन गायकवाड,प्रकाशक प्रशांत गोरे,सुमनताई मुठे, संमेलनाचे अध्यक्ष साहित्यीक भारत सातपुते,व्याख्याते अमोल चीने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीरामपूरचे प्रसिध्द कवी,गझलकार तथा जीवन जीवनगौरव शैक्षणिक मासिकाचे सहसंपादक आणि काव्यदरबार ईदिवाळी अंकाचे संपादक रज्जाक शेख यांनी साहित्य क्षेत्रात अल्पावधीतच मोठे यश संपादन केलेले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सलग चौथ्यांदा निवड झाली आणि राज्यभरात शंभराहून अधिक संमेलनातून करत असलेल्या प्रबोधनपर कवितांच्या सादरीकरणाबद्दल शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.राज्यातील विविध वृत्तपत्रातून "खेळू करू शिकू" या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांतर्फे शैक्षणिक कविसंमेलनात दोनदा काव्यसादरीकरणाची संधी मिळाली.राज्यभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या बालकविता व शेतीमातीच्या जवळपास अठराशे वेळा कविता प्रकाशित झाल्या आहेत. नाशिक येथील कवी नारायण सुर्वे कट्ट्यावरील संमेलन,जीवनगौरव मासिकाचे औरंगाबाद येथील संमेलन, अण्णाभाऊ साठे संमेलन स्वराज्य संस्थेचे संमेलन,एक मैफिल कवितांचे संमेलन अश्या डझनभर संमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.