भारत व पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला. तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ चा हंगाम एका आठवडा पुढे ढकलला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, सध्या लीग एका आठवड्या करिता पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय करू. यासाठी बोर्ड एक स्वतंत्र कार्यक्रम जारी करेल. लीगसाठीच्या खिडकीबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'सर्व बोर्ड आम्हाला पाठिंबा देतात. अशा परिस्थितीत, खिडकी ही चिंतेची बाब नाही. परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत ते म्हणाले, 'हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, ते स्वतःच यावर निर्णय घेतील.' यापूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी रात्री सांगितले होते की, सध्याच्या परिस्थितीत आयपीएलचा अठरावा हंगाम सुरूच राहील, परंतु आता बोर्डाने तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी, धर्मशाळा येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळलेला सामना रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानी लष्कर करत ड्रोन हल्ल्यांमुळे सामना थांबविण्यात आला आणि प्रेक्षक आणि खेळाडूंना मैदानाबाहेर काढण्यात आले. धर्मशाळेतील तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. तथापि, गुरुवार पासूनच आयपीएल २०२५ बद्दल शंका उपस्थित होत होत्या.
देश युद्धात असताना क्रिकेट सुरू आहे हे चांगले दिसत नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हंटले आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम अंतिम टप्प्यात होता आणि अंतिम सामन्यासह एकूण १६ सामने खेळायचे बाकी होते. आयपीएल २०२५ च्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे तो एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानात सुरू केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला. पाकिस्तानने रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर आणि जैसलमेर येथील लष्करी तळांवर आणि शस्त्रास्त्र केंद्रांवर लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची चार लढाऊ विमाने पाडली. यामध्ये अमेरिकेत बनवलेल्या दोन एफ-१६ आणि चीनमध्ये बनवलेल्या दोन जेएफ-१७ विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या अति धाडसाला योग्य उत्तर देत, भारताने एकाच वेळी लाहोर, इस्लामाबाद, पेशावर आणि सियालकोटसह शेजारच्या देशातील सात शहरांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. लष्कर आणि हवाई दलानंतर नौदलही त्यात सामील झाले.
दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही एक निवेदन जारी करून म्हटले होते की, ते भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये भाग घेत होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, आम्ही पाकिस्तान आणि भारतातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन सरकार, पीसीबी, बीसीसीआय आणि स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून नियमित सल्ला आणि अपडेट्स मिळवणे आणि या प्रदेशातील आमच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी संवाद राखणे समाविष्ट आहे.
भारतात आयपीएल सुरू असताना पाकिस्तानातही पीएसएल सुरू आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आयोजित करण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) आशा अडचणीत येऊ शकते. भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाबद्दल एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) चिंतेत आहे. वास्तविक पीसीबीने शुक्रवारी जाहीर केले होते की, उर्वरित पीएसएल सामने यूएईमध्ये खेळवले जातील. तथापि, आता माहिती आली आहे की, पाकिस्तानच्या पीएसएल आयोजित करण्याच्या आशा धुळीस मिळू शकतात. पीसीबीने शुक्रवारी सांगितले की, आता शेवटचे आठ सामने यूएईमध्ये खेळवले जातील. यापूर्वी हे सामने रावळपिंडी, मुलतान आणि लाहोर येथे खेळवले जाणार होते. सामन्यांची तारीख, वेळ आणि ठिकाण योग्य वेळी शेअर केले जाईल,
युएईमध्ये क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या दक्षिण आशियाई लोकांची विविधता आहे असे वृत्तसंस्था एएनआयने ईसीबीच्या एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीत पीएसएल सारख्या स्पर्धेचे आयोजन केल्याने सुसंवाद बिघडू शकतो, सुरक्षेचे धोके निर्माण होऊ शकतात आणि समुदायांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. गुरुवारी पीसीबीने रावळपिंडी स्टेडियमवर पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील नियोजित सामना रद्द केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या लीगमध्ये सहभागी होणारे इंग्लिश खेळाडू लिग सोडण्याचा विचार करत असल्याचे ब्रिटिश माध्यमांमधील वृत्तात म्हटले आहे.
एकंदर सदर परिस्थितीकडे बारकाईने बघीतले तर युध्द आणि क्रिकेट एकाच वेळी चालणं अशक्य आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात आली असता पाकच्या नापाक निती व कृतीमुळे शांतीचा संदेश देणाऱ्या, एकता जपणाऱ्या व सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जाणाऱ्या क्रिकेट खेळाला काही काळ का होईना स्टेडियम बाहेर जावे लागत आहे. याची झळ निव्वळ आयपीएललाच नव्हे तर पाकच्या पीएसएललाही बसली आहे. जराशीही सभ्यता शिल्लक नसलेल्या पाकला क्रिकेटच काय तर स्वतःच्याच देशातील सामान्य जनतेच्या जीवीताचा व भविष्याचा विसर पडला आहे. कदाचित स्वतःचा सर्वनाश झाल्याशिवाय ते थांबणार नसावेत. म्हणूनच विनाशकाले विपरीत बुध्दी यालाच म्हणत असावे.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२