श्रीरामपूर / प्रतिनिधी:
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये संस्थेतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात स्व. सौ. एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर या शाळेतील भक्ती भागवत शिंदे हिने कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षेमध्ये इयत्ता सातवी मध्ये १०० पैकी ९२ गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू व सध्या रयत शिक्षण संस्थेचे संघटक म्हणून कार्यरत असलेले डॉ.अनिल पाटील, संस्थेचे चेअरमन निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी,संस्थेचे सचिव निवृत्त आयएएस अधिकारी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भक्तीचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
खूप दिवसापासून आपल्या एखाद्या तरी मुलाने रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवावा असे तिच्या पालकांचे स्वप्न होते. भक्तीच्या या यशाच्या रूपाने पालकांचे हे स्वप्न पूर्ण झाले. या यशामध्ये भक्ती सोबतच तिची आई अश्विनी आणि तिचे बाबा प्रा. डॉ भागवत शिंदे यांचाही खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे.
या सत्कार प्रसंगी भक्तीचं हे नेत्रदीपक यश खरोखरच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असून आशिया खंडामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेमधून प्रथम क्रमांक मिळवून गौरव प्राप्त करणं हे नक्कीच एका तेजस्वी भविष्याचं संकेत आहे,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दुरस्थ शिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.
भक्तीच्या या उज्वल यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.मीनाताई जगधने, मुख्याध्यापिका सौ. सोनाली पैठणे, वर्गशिक्षिका अनिता चेडे मॅडम, मुख्याध्यापक सुनील साळवे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर या सर्वांनी तिचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भक्तीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111