तातडीने पशुरुग्णालयात नेऊन केले उपचार, अधिष्ठातांकडून कौतुक.
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खोटे नगर येथील 'आल्हाद' वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी भूतदया दाखवित एका अपघातग्रस्त भटक्या कुत्र्याला वेळेवर उपचार मिळवून देत त्याचा जीव वाचवला. विद्यार्थ्यांच्या या प्रशंसनीय कृतीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
खोटे नगर या भागात एका भरधाव वाहनाने भटक्या कुत्र्याला जबर धडक दिली होती. यात तो कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. ही घटना जवळून जात असलेल्या 'जीएमसी'च्या आल्हाद मुलांचे वसतिगृह येथे राहत असलेल्या विद्यार्थांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कुत्र्याला उचलून महाबळ परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पशुवैद्यकांनी सांगितले की, कुत्र्याची स्थिती चिंताजनक होती. परंतु विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवित वेळेवर उपचार करण्यासाठी आणल्यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये सर्वेश काबरा, आदर्श वानखेडे, गौरव काटोणे, अंकुर जाधव, चेतन पाटील व कृष्णा शिंपी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेतील कुत्र्याला उचलले. वसतिगृह प्रमुख डॉ. डॅनीयल साजी यांच्या मदतीने दुचाकीवर रुग्णालयात नेले आणि उपचारासाठी आवश्यक ती मदत केली. सदर विद्यार्थ्यांचे खोटे नगर परिसरासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे भूतदया व सामाजिक बांधिलकी हे गुण दिसून आले, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता इतरांसाठी ही प्रेरणादायक ठरत आहे.