श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारत सरकारने JIPMER सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये अलीकडेच अॅलोपथी आणि आयुर्वेद यांचा संमिश्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या प्रकाराला "मिक्सोपॅथी" असे संबोधते आणि याचा तीव्र निषेध करते.
मिक्सोपॅथी म्हणजे नेमकं काय?
मिक्सोपॅथी म्हणजे दोन वेगवेगळ्या वैद्यकीय प्रणालींचं एकत्रिकरण – उदा. अॅलोपथी (modern medicine) आणि आयुर्वेद. ऐतिहासिकदृष्ट्या या प्रणाली स्वतंत्र, वेगळ्या तत्त्वांवर आधारित आहेत. त्यांचा मूलभूत विज्ञान, निदानाची पद्धत, औषधांचे क्रियावैज्ञानिक तत्त्व आणि उपचारपद्धती पूर्णतः भिन्न आहेत.
या निर्णयाचे गंभीर दुष्परिणाम:
१) रुग्णांच्या आरोग्याशी धोका – दोन भिन्न वैद्यकीय प्रणालींचे ज्ञान अपूर्ण स्वरूपात शिकून डॉक्टर तयार करणे म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळणे.
२) वैद्यकीय शिक्षणाची अधोगती – JIPMER सारख्या संस्थेत असे अभ्यासक्रम सुरू होणे म्हणजे दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाचा अपमान आहे.
३) पारंपरिक चिकित्सा शाखांचेही अवमूल्यन – आयुर्वेद हे एक शास्त्र आहे. ते योग्य प्रकारे शिकणं आणि अंमलात आणणं आवश्यक आहे. त्याचे अर्धवट ज्ञान मिळवून कोणीही 'मिश्र' डॉक्टर होणं हे आयुर्वेदालाही अन्यायकारक आहे.
४) आरोग्यसेवेतील भ्रम आणि अराजकता – रुग्ण कोणत्या पद्धतीने उपचार घेत आहेत हेच समजेनासं होईल. यातून चुकीचे उपचार, औषधांचे परस्परविरोधी परिणाम, आणि गंभीर गुन्हे संभवतात.
आय. एम. ए.च्या वतीने आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की – आरोग्य धोरण ही विज्ञानाची शाखा आहे, तडजोड करण्याची जागा नाही. 'मिक्सोपॅथी' थांबवा,रुग्णांचे संरक्षण करा !
माजी अध्यक्ष: आय एम ए (महाराष्ट्र राज्य)
तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आय एम ए