जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जेव्हापासून भारतात मराठी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या, तेव्हापासून जी प्रमुख नावे समोर येऊ लागली त्यात डॉ. उदय निर्गुडकर एक प्रमुख नाव होते. मध्यमवयीन देखणे व्यक्तिमत्व आणि बहुश्रुत बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम असलेले डॉ. निरगुडकर हे माध्यमांवर हळूहळू प्रतिष्ठित होत गेले. त्यामुळे या माणसाशी आपला परिचय व्हायला हवा असे मला वारंवार वाटायचे. मात्र हा परिचय व्हायला चक्क २०१४ हे वर्ष उजाडले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा माहोल सुरू झाला होता. दररोज वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात माझ्यासारख्या राजकीय पत्रकारांना सहभागी करून घेत होते. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आणि लगेचच मुंबई दूरदर्शनने मला एका चर्चेत सहभागी व्हायला बोलावले. मुंबईतील ती चर्चा आटोपून नागपुरात परत येत नाही तोच आयबीएन लोकमतचा प्रतिनिधी अखिलेश साळवे चाचा फोन आला आणि त्याने त्यांच्याही एका चर्चेत सहभागी होण्यासाठी मला निमंत्रित केले. त्यावेळी डॉ. उदय निरगुडकर हे या वाहिनीचे मुख्य संपादक होते. अखिलेशला मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता चर्चेचे चित्रीकरण होते. सकाळी अकरा वाजता अचानक माझा मोबाईल खणखणला. तो अनोळखी नंबर होता. मी लगेचच फोन उचलला. अविनाश पाठक बोलतोय मी असा मी होकार देताच समोरून आवाज आला नमस्कार मी डॉक्टर उदय निरगुडकर आयबीएन लोकमतचा मुख्य संपादक, आज दुपारी आमच्या चर्चेत तुम्ही सहभागी होत आहात त्याबद्दलच मी फोन केला होता. त्या काळात उदय निरगुडकर हे एक सेलिब्रेटी व्यक्तिमत्त्वच होते. त्यामुळे मी एकदम दचकलो. मग क्षणभरात स्वतःला सावरत त्यांच्याशी चर्चा केली आणि फोन बंद झाला. मग दुपारी पाच वाजता चर्चेत आम्ही सहभागी झालो होतो. त्यात डॉ. निरगुडकर देखील होते. पडद्यावरचा तो माझा आणि त्यांचा पहिला संपर्क होता.
कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा फोन आला आणि आता अधून मधून संपर्कात राहूया असे त्यांनी सुचवले. मी देखील त्याला मान्यता दिली.
त्यानंतर दोन महिन्यातच एका कार्यक्रमासाठी डॉ. निरगुडकर नागपूरला आले होते. त्यावेळी पत्रकार संघात त्यांचा पत्रकारांशी वार्तालाप हा कार्यक्रम ठरला होता. त्या कार्यक्रमासाठी मी थोडा वेळ आधीच पोहोचलो. तेव्हा डॉक्टर निरगुडकर देखील तिथे आले असल्याचे कळले पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या दालनात ते एकटेच बसले होते. मी तिथे गेलो आणि मी अविनाश पाठक अशी त्यांना ओळख करून दिली. ते लगेचच उठले आणि माझ्याशी हस्तांदोलन करत त्यांनी मला बाजूलाच बसवले. मग कार्यक्रम सुरू होईपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. ही ही आम्हा दोघांची पहिलीच भेट होती. मात्र आम्ही दोघेही खूप जुने मित्र असल्यासारखे त्या दिवशी बोललो. १५ मिनिटांच्या त्या गप्पांमध्ये हा माणूस किती बहुश्रुत आहे हे दिसून आले. पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमातही त्यांची बहुश्रुतता वारंवार जाणवत होतीच. त्यादिवशी निघताना पुन्हा एकदा आपण असेच भेटत राहू या असे ठरवूनच आम्ही आपापल्या वाटांनी निघालो.
नंतर प्रत्यक्ष भेटीचा योग फारसा येत नव्हता. मात्र फोनवर अधून मधून बोलणे व्हायचे. विधानसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, या सर्वांच्या वेळी त्यांनी मला चर्चेला निमंत्रित केले होते. मध्यंतरी एकदा विश्वसंवाद केंद्राच्या एका कार्यक्रमाला ते आले असताना देखील आमची घाई गडबडीतच भेट झाली होती.
मधल्या काळात त्यांनी आयबीएन लोकमत सोडले आणि झी २४ तास ला जॉईन झाले. तिथेही आमचा संपर्क होताच. झी चे मालक सुभाषचंद्र गोयल यांनी एक पुस्तक लिहिले होते. निरगुडकारांनी ते पुस्तक आवर्जून माझ्या पत्त्यावर पाठवले आणि त्या पुस्तकावर मी लिहावे अशी सूचनाही केली. पुस्तक मिळाल्याचा मी त्यांना फोनही केला.
दरम्यानच्या काळात त्यांनी झी२४ तास देखील सोडले आणि ते मुक्त पत्रकारिता करू लागले. त्यात मग आमचा परस्परांचा संपर्क अधिकच वाढला.
२०१९ च्या शेवटी शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सीएए आणि एन आर सी हे दोन कायदे लागू केले होते. त्याला देशभरातून मुस्लिम समाजाकडून प्रचंड विरोध होत होता. दिल्लीत या मुस्लिम संघटनांनी चक्क धरणे धरले होते. त्याचवेळी या कायद्याला समर्थन देणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांनी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे सुरू केले. त्यावेळी भारत विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या नागपुरातील एका शाखेचा मी अध्यक्ष होतो. भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणींने आपल्या देशभरातील शाखांना सीएए आणि एन आर सी यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम घ्यावेअशा सूचना पाठवल्या होत्या. याबाबत काय करावे असा विचार मी आणि माझ्या सहकाऱ्यांसमोर आला. त्यावेळी हा विषय समजावून सांगणारे एखादे व्याख्यान ठेवूया असा प्रस्ताव पुढ्यात आला. मग वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू झाली बोलता बोलता उदय निरगुडकर यांचे नाव समोर आले. त्यांना बोलावणार कोण अशी चर्चा माझ्या सहकाऱ्यांमध्ये सुरू झाली. तेव्हा मी सांगितले की मी त्यांच्याशी बोलतो. माझे ते चांगले मित्र आहेत. लगेचच निरगुडकरांना फोन लावला. त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला तेव्हा ते नागपूरला व्याख्यानासाठी यायला लगेचच तयार झाले. या व्याख्यानासाठी मानधन काय घेणार असा प्रश्न विचारला असता अविनाश पाठक सारखा मित्र आकार्यक्रम आयोजित करतो आहे, आणि राष्ट्रीय विषयावर जनजागरणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला मानधन नको असे सांगत फक्त माझ्या जाण्या येण्याची आणि नागपुरात दोन दिवस राहण्याची सोय कर, मी येतो, असे सांगत त्यांनी मला आश्वस्त केले.
त्याच दरम्यान मी देखील मुंबईला जाणार होतो. मग मुंबईच्या माझ्या वास्तव्यात एक दिवस संध्याकाळी नरिमन पॉईंटला एका ठिकाणी आम्ही दोघेही भेटलो, आणि तिथे कार्यक्रम कधी करायचा कसा करायचा हे सर्व आम्ही निश्चित केले.
ठरल्याप्रमाणे एक दिवस आधीच निरगुडकर नागपुरात येऊन पोहोचले. आमच्या भारत विकास परिषदेच्या एका कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्येच त्यांच्या निवासाची आम्ही सोय केली होती. तिथे त्यांचे सामान ठेवले आणि मग आम्ही सोबत जेवायला गेलो. दुपारी तब्बल दोन तास आमच्या गप्पा झाल्या. मग त्यांना देखील इतर काही भेटीगाठी घ्यायच्या होत्या. तेव्हा त्यांना तिकडे रवाना करून आम्ही देखील निघालो.
नेमके त्यादरम्यान मला व्हायरल फिवरने पछाडले होते. तशाही अवस्थेत माझी सहकारी श्रुती देशपांडेच्या कार मध्ये मी निरगुडकर यांच्या स्वागताला विमानतळावर गेलो होतो. माझी अवस्था बघून त्यांनी मला विश्रांती घ्या अशी सूचना केली होती.
दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम ठरला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे होते. ठरल्याप्रमाणे निरगुडकर आणि हंसराज भैय्या: दोघेही पोहोचले आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीची सर्व प्रास्ताविकाची भाषणे आटोपल्यावर डॉक्टर निरगुडकर भाषणाला उभे राहीले आणि तब्बल एक तास पसतीस मिनिटे ते आपल्या ओघवत्या वाणीत बोलत राहिले. त्यावेळी सभागृह भरगच्च भरले होते. इतकेच काय पण बाहेर बालकनीत देखील खुर्च्या टाकून श्रोते बसले होते. उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती(सहकुटुंब )तर होतेच, पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दोन विद्यमान न्यायमूर्ती देखील सभागृहात निरगुडकरांचे भाषण ऐकण्यासाठी येऊन बसले होते. सभागृहात मागे बसलेल्या माझ्या एका वकील मित्राने मला कार्यक्रम सुरू असतानाच एसएमएस करून त्याबाबत कळवले होते. कार्यक्रम आटोपल्यावर लगेचच निरगुडकरांचे परतीचे विमान होते. त्यामुळे फारसे न थांबता ते लगेच निघाले. मात्र निघताना सोबत असलेल्या माझ्या पत्नीला यांच्या प्रकृतीची काळजी घ्या असे सांगून ते निघाले होते.
त्यानंतर लगेचच कोरोना आला. त्यामुळे देशभरातले सगळेच व्यवहार जवळ जवळ ठप्प झाले होते. मात्र त्याही काळात माझे आणि डॉ. निरगुडकर यांचे फोनवर बोलणे सुरू असायचेच.2020 च्या नोव्हेंबर महिन्यात माझ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करायचे होते. त्यावेळी मी नियमित लेखन करत असलेल्या दिल्लीच्या चाणक्य वार्ता पाक्षिकाचे संपादक डॉ. अमित जैन माझ्या मदतीला आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा माझा संपर्क करून दिला. कोशियारीजींनी ऑनलाईन समारंभात पुस्तक प्रकाशन करायचे मान्य केले. मग त्यानुसार कार्यक्रम ठरला. पुस्तकावर बोलण्यासाठी कोणाला विचारावे असा विचार करता करता डॉ. निरगुडकर यांचे नाव पुढे आले आणि त्यांनीही तत्काळ होकार दिला. पुस्तकांचा मजकूर त्यांना ईमेलवरच पाठवला. मग पुस्तकावर बोलण्यासाठी डॉ. निरगुडकर आणि माझे एक स्नेही माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती आणि संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मी नारायण भाला हे देखील सहभागी झाले होते. त्या दिवशी माझ्या दृष्टिक्षेप आणि सत्तेच्या सावलीत या दोन्ही पुस्तकांवर डॉ. निरगुडकर भरभरून बोलले. अविनाश पाठक यांनी आता कादंबरी लिहायला घ्यावी आणि त्याचे प्रकाशन आपण नागपूरला वसंतराव देशपांडे सभागृहातच करू, त्यासाठी मी देखील येईल, असा त्यांनी शब्दही दिला. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमाला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला.
याच काळात मी पंचनामा या नावाने एक न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनेल सुरू केले होते. या चॅनलवर मी दोन चर्चांचे आयोजन केले होते त्यातील एक चर्चा होती, येत्या पाच जुलैला पंतप्रधान मोदी कोणता धमाका करणार, आणि दुसरी चर्चा होती येत्या 15 ऑगस्ट ला पाकव्याप्त काश्मीरात तिरंगा फडकणार काय, या दोन्ही चर्चांचे सूत्रसंचालन करावे म्हणून मी डॉ. निरगुडकर यांना विनंती केली. त्यांनी देखील लगेच मान्य केले आणि ऑनलाईन झालेल्या या चर्चामध्ये ते सहभागी झाले. या चर्चांमध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश व्यास, करनल अभय पटवर्धन, अभिनंदन पळसापुरे असे सर्व दिग्गज सहभागी झाले होते. निरगुडकर यांनी सूत्रसंचालन केल्यामुळे चर्चा मध्ये विशेष रंग भरला होता हे नमूद करायलाच हवे.
2023 मध्ये पत्रकार चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाची फाळणी रोखू शकणारा महापुरुष या शीर्षकाखाली मराठी भाषांतर डॉ. निरगुडकर यांनी केले होते त्यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेचा मी विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष होतो. त्यामुळे साहित्य परिषदेतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात करावे असे आम्ही ठरवले. त्यानुसार निरगुडकरांना विनंती केली. त्यांनी देखील लगेच होकार दिला. त्यानुसार मग नितीन गडकरींना वेळ मागितला. त्यांनी लगेच होकार देत कार्यक्रम निश्चित केला.
ठरल्यानुसार पुस्तक प्रकाशाला डॉ. निरगुडकर स्वतः पोहोचले होते. नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमर वझलवारकडे नाश्त्यावर आमच्या गप्पाही होत्या.
या कार्यक्रमानंतर माझी मुंबईलाही चक्कर झाली नाही, आणि निरगुडकर नागपुरातही आले नाहीत. त्यामुळे आमच्या भेटी झाल्या नाहीत. माझ्या आठवणीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये ते एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. फार थोडा वेळ ते नागपुरात होते. त्यावेळी मी प्रचंड आजारी होतो. घरी झोपून असल्यामुळे मला बाहेर निघणे शक्य नव्हते. माझी प्रकृती ठीक नाही हे कळल्यावर निरगुडकर यांचा घरी फोन आला. मी इतका आजारी कशाने झालो असे विचारल्यावर जेव्हा त्यांना चिकनगुनियाने मी आडवा आहे हे कळले, आणि त्यावर त्यांची मिस्कील कॉमेंट होती, तुम्हाला चावणारा डास हा नक्कीच डाव्या विचारांचा असणार. त्यामुळेच तुम्ही इतके आजारी झाले. त्यांच्या या कॉमेंटवर त्याही परिस्थितीत मला हसू आल्याशिवाय राहिले नाही.
नंतर त्यांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा द्यायला फोन केला होता. तेव्हा तुमचा फोन आला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी उलथापालथ होत असणार, अशी टिपणी त्यांनी केली होती. जेव्हा तुमचा वाढदिवस हीच मोठी उलाढाल आहे असे मी सांगितले तेव्हा ते खेळाळून हसले होते.
नंतर मात्र या तीन-चार महिन्यात माझे त्यांचे बोलणे नाही. अजूनही एखादा दिवशी मूड झाला की मी त्यांना फोन करीन. त्यावेळी त्यांचा फोन उचलून लगेचच प्रतिसाद येईल बोला अविनाश पाठक मी काय करू तुमच्यासाठी, आणि मग काही काळ आमच्या खुशालीच्या गप्पाही रंगतील.
उदय निरगुडकर हे आजही मराठी पत्रकारितेतील एक मोठे नाव म्हणूनच ओळखले जाते. एक पत्रकार, एक प्रभावी वक्ते आणि एक विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारणावर जितके अभ्यासपूर्ण ते बोलतात, तितकेच अभ्यासपूर्ण ते संगीताच्या मैफिलीचे सूत्रसंचालन करताना बोलतात हे महाराष्ट्राने टीव्ही वाहिन्यांवरील संगीताच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनात अनुभवले आहे. आजही प्रचंड मागणी असणारा अभ्यासू वक्ता म्हणून ते ओळखले जातात. आणि अशा अभ्यासू व्यक्तीशी माझी मैत्री आहे ही बाब माझ्यासाठी आनंददायीच ठरणार नाही काय?