जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज २२ जुलै २०२५. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस. आज देवेंद्र फडणवीस हे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्याही राजकीय क्षितिजावर वारंवार चर्चिले जाते आहे. महाराष्ट्रात सतत पाच वर्ष राज्यकारभार करणारे दुसरे मुख्यमंत्री तर ते आहेतच. मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी देखील त्यांनी मिळाली आहे. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपैकी वसंतराव नाईक आणि शरद पवार या दोघांनंतर अतिशय लोकप्रिय असणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते आहे.
आणखी एक विशेष असे की फडणवीस नागपूरचे आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत नागपूर शहरातील कोणीही मुख्यमंत्री झाला नव्हता. तो मान फडणवीस यांना मिळाला आहे आणि विशेष म्हणजे लागोपाठ दोनदा ते मुख्यमंत्री झाले आहेत.
फडणवीस नागपूरचे असल्यामुळे नागपूरकरांना ते चांगलेच शुभेच्छाित आहेत. नागपुरात अनेकांनी त्यांच्या बालपणापासून तर आजपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. अशा अनेकांपैकी मी देखील एक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर गंगाधरराव फडणवीस यांचा मुलगा ते दिविजा फडणवीसचे बाबा इथपर्यंतचा त्यांचा प्रवास मी बघितला आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर आज पर्यंत किमान ५० तरी लेख मी लिहिले असतील. यावेळी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही वृत्तपत्रांनी मला लेख मागितले होते. मात्र व्यक्तिगत स्तरावर त्यांचे जे काही संबंध आले त्याबाबत आजच्या या आयुष्यातले सांगाती मध्ये मी लिहायचे ठरवले आहे.
देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस हे देखील तत्कालीन जनसंघाचे नगरसेवक होते. आमच्या लक्ष्मी नगर वार्डाचेच नगरसेवक म्हणून ते १९६९ मध्ये निवडून आले होते. तेव्हापासून त्यांचे आमच्या घरी येणे जाणे होते. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे चांगलेच स्नेहबंध होते. त्या काळात मी कॉलेजमध्ये शिकत होतो. अनेकदा बाबांचा काही निरोप घेऊन गंगाधररावांच्या धरमपेठ येथील घरी गेलो की अंगणात लहान देवू आपल्या सोबत्यांसोबत खेळताना मी बघितला आहे.
१९७५ मध्ये आणीबाणी लागली. त्यावेळी गंगाधरराव नागपूरचे उपमहापौर होते. आणीबाणीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. त्यांना अटक झाल्याचे कळताच माझ्यासारखे अनेक लोक त्यांच्या घरी भेटायला गेलो गेले होते. नंतर अवघ्या दोन महिन्यातच मी नागपूरच्या धरमपेठ भागातच माझा फोटो स्टुडिओ सुरू केला. देवेंद्रच्या आई सरिता वहिनींचा बाजारात किंवा तत्सम कामांसाठी जाण्या येण्याचा रस्ता माझ्या स्टुडिओ समोरूनच होता. मग येता जाता त्या कधीमधी थांबून बोलायच्या सुद्धा. त्यावेळेस अनेकदा देवेंद्र आणि आशिष त्यांच्यासोबत असायचे. तेव्हा माझी भेट व्हायची. पुढे १९७७ मध्ये आणिबाणी उठली. देशात सत्तांतर झाले. वर्षभरातच गंगाधरराव आमदार झाले. तोवर देवेंद्र थोडा मोठा झाला होता. १९८० मध्ये गंगाधररावांच्या पुतणीच्या साखरपुड्याचे आणि पुढे लग्नाचे फोटो काढायला गंगाधररावांनी मला बोलावले होते. त्यावेळेसही लहानग्या देवेंद्रशी माझ्या गप्पा झाल्या होत्या.
हळूहळू दिवस पुढे जात होते. देव्येंद्र मॅट्रिक दहावी पास झाला आणि कॉलेज साठी फोटो काढायला माझ्याकडेच आला होता. त्यावेळी माझ्या स्टुडिओच्या शोकेस मध्ये गंगाधररावांचे एक मोठे पोर्ट्रेट लावले होते. मित्रांसोबत आला की देवेंद्र मित्रांना हे बघ माझ्या बाबांचे फोटो म्हणून दाखवायचा सुद्धा. शाळेच्या दिवसात त्या भागातच या मुलांचे खेळणे असायचे. कित्येकदा त्या परिसरात सायकल चालवत फिरणारा देवेंद्र मी बघितला आहे. तेव्हापासून आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत होतो. तो भेटला की मी हमखास त्याची चौकशी करायचो. गंगाधर राव कुठे आहेत हे देखील त्याला विचारायचो.
१९८८ मध्ये गंगाधरराव कर्करोगाच्या आजाराने वारले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भांबावलेला देवेंद्र मला आठवतो. मात्र त्याही परिस्थितीत त्याने आपल्या अभ्यासातली एकाग्रता सोडली नव्हती.
फोटोग्राफीबरोबरच मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून देखील कार्यरत होतो. त्या काळात धरमपेठ भागातील तरुणांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वृत्तचित्र वृत्तचित्रण मी केले होते. त्यात देवेंद्र उत्साहाने सहभागी असायचा.
याच दरम्यान मी दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करण्याकरिता एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी बँकेचे अर्थसहाय्य देखील मंजूर झाले होते. मात्र सरकारी अडथळ्यामुळे तो अडकला होता. याच काळात वयाची जेमतेम २२ वर्षे पूर्ण होत असतानाच देवेंद्र नगरसेवक म्हणून निवडून आला .त्याच्याच बरोबर आमच्याच भागातून अनिल सोले देखील विजयी झाला होता. त्यावेळी या दोघांचीही चांगली मैत्री होती. माझ्या अडलेल्या प्रकल्पाबाबत देवेंद्रला कळले आणि या प्रकल्पाला आपण मार्गी लावले तर भविष्यात आपल्यालाही त्याचा उपयोग होईल म्हणून त्याने त्यात लक्ष घालायचे ठरवले. तेव्हापासून माझे आणि देवेंद्रचे सातत्याने संबंध आले. त्या काळात माझ्या जुन्या बजाज कब स्कूटर वर काही वेळा देवेंद्रला मी डबल सीट देखील नेले होते. त्या प्रकल्पासंदर्भात आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी देवेंद्रने बरेच लक्ष घातले होते. मात्र दुर्दैवाने प्रकल्प पुढे सरकला नाही. शेवटी मी नाद सोडला. मात्र यामुळे आम्हा दोघांच्याही वयात बरेच अंतर असतानाही आमची चांगली मैत्री जमली.
याच काळात मी पूर्णवेळ पत्रकारितेत सक्रिय झालो होतो. त्यामुळे देवेंद्रचा माझा सतत संपर्क येत होता. २९९७ मध्ये नागपूर महापालिकेच्या पुन्हा एकदा निवडणूका झाल्या. त्यावेळी पुन्हा देवेंद्र नगरसेवक म्हणून विजयी झाला आणि लगेचच नागपूरचा महापौर बनला. वयाच्या २७ व्या वर्षी झालेला तो पहिला महापौर होता. देवेंद्रच्या पदग्रहण समारंभाला मी स्वतः उपस्थित होतो. आधी महापालिकेच्या हिरवळीवर सभा झाली आणि त्यानंतर देवेंद्र आपली पद स्वीकारण्यासाठी महापौरांच्या कार्यालयात पोहोचला. महापौरांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी तो तिथेच थांबला आणि मागून येत असलेल्या आपल्या मातोश्री म्हणजेच सरिता वहिनींकडे त्याने पाहिले. सरिता वहिनी समोर आल्या. त्यांच्या पाया पडून देवेंद्रने आशीर्वाद घेतले आणि मगच तो महापौरांच्या कृतीवर बसला होता. देवेंद्र खुर्चीवर बसल्यावर बाजूला सरिता वहिनींना उभे करून नागपुरातील सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या छायाचित्रकारांनी फोटो देखील काढले होते.
१९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र पश्चिम नागपुरात भाजप तर्फे उमेदवारी देण्यात आली. देवेंद्रचा जनसंपर्क आणि त्याचे वक्तृत्व या जोरावर आमदार म्हणूनही देवेंद्र विजयी झाला. त्या काळात मी विधिमंडळाचे अधिवेशन कव्हर करण्यासाठी मुंबईला जात असे. नाशिक गावकरी साठी मी विधान परिषदेत वृत्त संकलन करत असे. तेव्हा नागपुरात माझे आई आणि वडील दोघेही वृद्ध होते. त्यांच्या प्रकृतीच्या सतत कुरबुरी असायच्या. शिवाय माझी मुलगी देखील लहान होती. त्यामुळे मी दर रविवारी नागपूरातून विदर्भ एक्सप्रेसने निघत असे. सोमवार ते शुक्रवार अधिवेशनात वृत्त संकलन करून बातमी द्यायची आणि शुक्रवारी संध्याकाळी विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला परत यायला निघायचो. शनिवारी आलो की घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून पुन्हा रविवारी मुंबईला निघायचो. असा कार्यक्रम मी करत असे. त्यावेळी माझे आरक्षण थ्री टायर मध्ये असायचे. मात्र विदर्भ एक्सप्रेसला लागणाऱ्या आमदार कोच मध्ये सर्व आमदार मित्र असल्यामुळे मी तिकडेच जाऊन बसत असे. त्यावेळी मुंबईला वृत्तसंकलनासाठी येणारे नागपूरचे इतरही काही पत्रकार गणेश कनाटे यदु जोशी अनिल मोहरील हे देखील असायचे. आम्ही सर्वच मग आमदार कोच मध्ये जाऊन बसायचो. तिथे हमखास देवेंद्रची भेट व्हायची. मग सर्वच तरुण मंडळींच्या गप्पा रंगायच्या. बरेचदा त्यात अरुण अडसड, चैनसुख संचेती,सुधीर मुनगंटीवार अशी ज्येष्ठ मंडळी देखील सहभागी व्हायची. त्यावेळी देवेंद्र तरुणच होता. सोबत गाडीत मुल च्या आमदार असलेल्या देवेंद्रच्या काकू शोभाताई फडणवीस देखील असायच्या .मग गाडीत चकल्लस चालायची. एकदा रामदास फुटाणेंनी त्यांचा फोडणी नावाचा वात्रटिका संग्रह मला दिला होता. गाडीत तो मी वाचत होतो. शोभाताईंनी मला तो बघायला मागितला. मी त्यांच्या हातात दिला तर देवेंद्रने त्यांच्याकडून घेत "ए काकू मला आधी बघू दे" म्हणून स्वतःच त्यातल्या वात्रटिका वाचायला सुरुवात केली. एकेका वात्रटिकेवर मग सगळ्यांच्याच एक्सपर्ट कॉमेंट्स, त्यात देवेंद्र आघाडीवर होता. अख्खी रात्र आम्ही जागत आलो होतो.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार चालवत त्या रस्त्यावरून नेली होती. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बसले होते. त्याची माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी केली होती. शेवटल्या टप्प्याचे लोकार्पण झाले तेव्हा देखील देवेंद्रजींनीच स्वतः कार चालवली होती. स्वतः कार चालवत नेण्याचा हा छंद फार पूर्वीपासून त्यांनी जपला होता.२००० किंवा २००१ चा हा प्रसंग असावा. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विदर्भ एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. आमदार कोच देखील अगदी भरून होता. त्यावेळी आम्हा पत्रकारांना गाडीत जागाच नव्हती. गाडी सीएसटी वरून सुटली. बर्थ ची सोय होताना दिसत नव्हती देवेंद्र सहजच बोलून गेला." एखादी कार असेल तर आपण कारने नागपूरला जाऊया" अनिल मोहरील ने लगेच सांगितले "माझी कार ठाण्याला आहे पण नागपूरपर्यंत चालवणार कोण?" देवेंद्रने लगेच सांगितले" तू काळजी करू नको, मी ड्रायव्हिंग करीन". मग अनिल मोहरीर, गणेश कनाटे देवेंद्र अजून एक जण असे ठाण्याला उतरले. तिथून अनिलच्या घरी जाऊन कार घेतली आणि कार चालवत थेट नागपूरपर्यंत ही मंडळी पोहोचली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नागपुरात एका कार्यक्रमात देवेंद्रची भेट झाली तेव्हा आम्ही आत्ताच दुपारी कारने पोहोचलो असे त्याने सांगितले. नंतर अनिल मोहरीलने सांगितल्यानुसार देवेंद्र संपूर्ण रस्ताभर कार चालवत आला होता. अशी धाडसं करायची त्याला तेव्हापासूनच सवय होती. रात्रभर नॉन स्टॉप कार चालवून देखील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवेंद्र अगदी ताजा तवाना दिसत होता.
आमदार म्हणून विधानसभेत अल्पावधीतच देवेंद्र आपला रुदबा निर्माण केला होता. २००१ च्या हिवाळी अधिवेशनात त्याने सभागृहात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडला. त्याला पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून विशेषतः शिवसेनेकडून प्रचंड विरोध होणार हे उघड होते. मात्र देवेंद्रने आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने सर्वांनाच काहीसे निरुत्तर केले होते. सत्ताधारी पक्षाला प्रस्ताव तर फेटाळायचा होता. मात्र देवेंद्रचे बिनतोड मुद्दे खोडून काढणे जड जात होते. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी चर्चेला उत्तर देताना देवेंद्रच्या अभ्यासू वक्तृत्वाचे कौतुक तर केले. मात्र त्याचवेळी फडणवीसंनी आता लग्न करावे, त्यांच्यासाठी मीच पश्चिम महाराष्ट्रातील मुलगी बघतो, असे सांगून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता.(त्यावेळी देवेंद्र अविवाहित होता) प्रस्ताव फेटाळला जाणार हे बघून देवेंद्रने प्रस्ताव मागे घेतला. त्या दिवशी सभागृहाबाहेर आम्हा सर्व पत्रकारांसमक्ष गोपीनाथजी मुंडे यांनी देवेंद्रचे तोंड भरून कौतुक केले होते.
सभागृहात आणि सभागृहाबाहेर आपल्या अभ्यासपूर्ण प्रगल्भ वक्तृत्वाने देवेंद्र कायमच इतरांना निरुत्तर करत असे. मात्र तरुण वय लक्षात घेता त्या काळातही जमेल तसा पोरकटपणा व्हायचाच. एकदा शेतकरी आत्महत्या प्रकरणावरून सभागृहात चर्चा सुरू असताना देवेंद्रसकट पाच-सहा तरुण आमदारांनी सभागृहातच चक्क तिरडी काढली. त्याचे पर्यावसान या सर्वांना सभागृहातून काही काळासाठी निलंबित करण्यात झाले. त्याआधी देखील एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका मंत्र्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी गोंधळ घातला म्हणूनही देवेंद्रला निलंबित करण्यात आले होते.
२००५ मध्ये देवेंद्रच्या आयुष्यात अमृताचा वर्षाव झाला. देवेंद्र फडणवीस अमृता रानडेशी विवाहबद्ध झाले. नागपूरच्या सातपुडा उद्यानात या विवाह निमित्त झालेल्या स्वागत समारंभात देवेंद्र चे जवळजवळ ७० ते ७५ हजार चाहते लोटले होते. यावरून त्या काळात देखील देवेंद्रजी लोकप्रियता काय होती हे लक्षात येते. या स्वागत समारंभात मी देखील उपस्थित होतो.
२००६ च्या ऑक्टोबर महिन्यात माझ्या आईचे निधन झाले. आईचे पार्थिव घेऊन आम्ही अंबाझरी दहनभूमीत पोहोचलो. आमच्या आधीच तिथे धरमपेठ भागातील एका भाजप कार्यकर्त्याच्या वडिलांचे निधन झाले म्हणून सर्वच कार्यकर्ते मंडळी अंबाझरी घाटावर आली होती. आम्ही पोहोचलो तेव्हा सर्व परततच होते. देवेंद्र आणि संजय बंगाले हे दोघेही येत असताना त्यांनी मला हातात आगटे घेऊन चालताना पाहिले. माझ्या सोबत असलेल्या विनोद जोशींना देवेंद्रने खुणेनेच विचारले. तेव्हा जोशींनी अविनाशची आई गेली असे सांगितले. लगेचच देवेंद्र, संजय बंगाले दोघेही परत फिरले आणि आमच्याबरोबर चालायला लागलै. अंत्यसंस्कार होईपर्यंत देवेंद्र आणि संजय पूर्ण वेळ थांबले होते. माझे सांत्वन करूनच ते परतले.
२००८ मध्ये देवेंद्र आणि अमृताच्या आयुष्यात दिविजाचे आगमन झाले. त्या काळात फडणवीस यांच्या घरी माझी चक्कर झाली नव्हती. २००९ च्या सुरुवातीला एक दिवस देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगखेडी लॉन्स मध्ये सत्यनारायणाची पूजा घातली असून तिथे सगळ्यांना संध्याकाळी प्रसादाला आणि स्नेहाभोजनाला बोलावले आहे असे निमंत्रण मिळाले. तिथे पोहोचल्यावर कळले की आज दिविजाचा पहिला वाढदिवस आहे. बगीच्यात ठीकठिकाणी दिविजाचे मोठमोठे फोटो लावले होते. त्यावरूनच हे लक्षात आले. देवेंद्रला तिथे भेटल्यावर मी विचारले तेव्हा काही नाही आज सत्यनारायण करायचे ठरले आणि योगायोगाने आज दिविजाचा वाढदिवस होता असे मिश्किल उत्तर त्याने दिले.
याच काळात नागपुरात भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठ क्रीडांगणावर एका भव्य शामियान्यात हे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या शेवटच्या दिवशी व्यासपीठामागे असलेल्या कक्षात गोपीनाथजी मुंडे बसले आहेत म्हणून त्यांना भेटायला मी जात होतो. तिथे एका कार्यकर्त्याने मला अडवले. त्यावेळी माझ्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना हा कार्यकर्ता अडवतो यामुळे माझा इगो जबरदस्त दुखावला आणि तिथेच मी आवाज चढवला. योगायोगाने बाजूलाच देवेंद्र उभा होता. तो लगेच धावला आणि अक्षरशः माझे तोंड दाबून मला बाजूला नेले."कशाला ओरडता अविनाशजी" म्हणून मला शांत करत आणि त्या कार्यकर्त्याला देखील थोडे समजावत मला आत गोपीनाथजींकडे देवेंद्रने नेले होते.
जून जून २००९ मध्ये माझ्या नव्या घराचा वास्तू झाला. त्यावेळी देवेंद्रला निमंत्रण दिले होते. मात्र अधिवेशन चालू असल्यामुळे देवेंद्र येऊ शकला नव्हता. नंतर थोड्याच दिवसात माझ्याच घरी हिंदुस्तान समाचार चे विदर्भ विभागीय कार्यालय देखील सुरू झाले. तेव्हाही देवेंद्रला बोलावले होते. मात्र देवेंद्र येऊ शकला नाही. लगेचच विधानसभेच्या निवडणुका आल्या. देवेंद्र दक्षिण पश्चिम नागपूरातून पुन्हा उमेदवार म्हणून उभा होता. अचानक एक दिवस मी दुपारी घरच्याच हिंदुस्तान समाचार ऑफिसमध्ये बसलो असताना आमच्या भागाच्या नगरसेविका छाया गाडे आल्या आणि दहा मिनिटात देवेंद्रजी तुमच्याकडे येत आहेत असा निरोप दिला. त्यावेळी देवेंद्र भाजपच प्रदेश सरचिटणीस देखील होता. लगेचच मी कार्यालयातील सहका-याला पाठवून एक पुष्पगुच्छ मागवला. पुढल्या दहाच मिनिटात देवेंद्र पोहोचला. तुमच्या घराच्या वास्तूला येऊ शकलो नाही म्हणून आज येतो आहे असे सांगून तो कार्यालयात बसला. मग त्या दिवशी त्याची सविस्तर मुलाखत घेऊन सगळीकडे पाठवली होती. चहापान झाल्यावर नवीन घरी आलोय ,तर घर दाखवता ना म्हणून त्याने संपूर्ण घरातही फेरफटका मारला. घरातील सर्व मंडळींना देखील देवेंद्र आवर्जून भेटला होता.
२०१२ मध्ये हिंदुस्थान समाचार तर्फे आम्ही देशाच्या विकासात छोट्या राज्यांची भूमिका या विषयावर एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात एक वक्ता म्हणून देवेंद्रजींना निमंत्रित केले होते. त्यावेळी त्याने छोटी राज्य निर्माण होण्यासाठी नेत्यांचा क्रेडिबिलिटी क्रायसेस जबाबदार असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. व्यासपीठावर असलेल्या बनवारीलालजी पुरोहितांनी त्याचे कौतुकही केले होते.
२०१३ मध्ये देवेंद्र भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाला. परिणामी त्याचा व्याप जास्तच वाढला. लगेचच लोकसभेच्या निवडणुका आल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले. निवडणूक निकाल जाहीर होताच देवेंद्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागला होता. त्याच काळात मी दै.पुढारीच्या संपादकांचा निरोप घेऊन देवेंद्रकडे गेलो होतो. संपादक सुरेश पवार आणि देवेंद्रचे मी फोनवर बोलणे देखील करून दिले होते.
नंतर विधानसभा निवडणुका आल्या. ऐनवेळी शिवसेनेची युती तुटली. देवेंद्रने एखादी एकहाती निवडणूक लढवली आणि भाजपला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवून दिले. भाजप सत्तेत आला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाचा पहिला मुख्यमंत्री बनण्याचा मान देवेंद्रला मिळाला. नागपूर नगरीतही मुख्यमंत्री बनणारा तो पहिलाच होता. त्यामुळे शपथविधी झाल्यावर तिसऱ्याच दिवशी त्याचे नागपुरात आगमन झाले तेव्हा भव्य स्वागत झाले होते. त्याच्या स्वागतासाठी आम्ही सर्वच पत्रकार विमानतळावर गेलो होतो. तिथे त्याच्यासोबत पाठीवर अडकवलेली बॅग घेऊन बाहेर येणारी दिविजा देखील भेटली. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची इतकी लहान मुलगी पहिल्यांदाच असावी.
दुसऱ्या दिवशी पत्रकार संघात देवेंद्रची मीट द प्रेस आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माझी भेट झाली. त्या दिवशीच मी निर्णय घेतला होता की आता देवेंद्रशी एकेरीत बोलायचे नाही. शेवटी मुख्यमंत्रीपदाचा देखील सन्मान राखला गेलाच पाहिजे. त्यामुळे तिथे मीट द प्रेस आटोपल्यावर विधान परिषदेतील नामनिर्देशित सदस्य नियुक्ती संदर्भात न्यायालयात दाखल एका याचिकेत मी इंटरव्हेनर असल्याची माहिती त्याला दिली. तेव्हा ती सर्व कागदपत्रे माझ्याकडे पाठवा, मी सरकारच्या वकिलालाही सांगतो असे त्याने मला आश्वस्त केले होते.
देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर पूर्वीसारख्या भेटणे कठीण झाले होते. मात्र कितीही व्यस्ततेत असले आणि मी समोर दिसलो की ते आवर्जून चौकशी करायचे. जर ते सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असले आणि मला त्यांना भेटायचे आहे असे लक्षात आले तर ते लगेच सुरक्षारक्षकांना बाजूला व्हायला सांगून मला बोलावून घेत असत. मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी जुने संबंध जपले हे बघून मी देखील सुखावत होतो.
पूर्वी प्रत्येक मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात नागपूर आणि मुंबईच्या पत्रकारांना एकत्रितपणे स्नेहभोजनाला बोलवत असे. देवेंद्रजींनी ती पद्धत बदलून दिवाळीत नागपूरच्या पत्रकारांना स्वतंत्रपणे रामगिरीवर स्नेहभोजनाला बोलवायला सुरुवात केली. २०१६ मध्ये नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या दै.श्रमिक एकजूटच्या दिवाळी अंकात मी कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस या दोघींच्या मी गौरीहारपूजीला आव्हानांचा या शीर्षकाखाली मुलाखती घेतल्या होत्या. स्नेहभोजनाच्या वेळी हा दिवाळी अंक सोबत घेऊन मी गेलो होतो. स्नेहभोजनानंतर देवेंद्रजी पत्रकारांना व्यक्तिशः भेटून गप्पा मारत होते. मी समोर दिसताच बोला अविनाशजी म्हणून त्यांनी आवाज दिला. मग मी त्या अंकातील नेमके अमृता फडणवीसांच्या मुलाखतीचे पान वर काढूनच त्यांच्या हातात दिले. अमृता फडणवीस यांची मुलाखत बघताच त्यांनी लगेचच "अरे वा अमृताला तुम्ही कुठे पकडलं" असा प्रश्न विचारला. जेव्हा मी ही आमची फोनवरची बातचीत आहे असे सांगितले तेव्हा ते एकदम खुश झाले. त्यांनी लगेच त्या अंकासोबत फोटो सुद्धा काढून घेतला. पुढल्या आठवड्यात अमृता नागपूरला येते आहे. तेव्हा तिला हा अंक द्या असेही त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात वसंतराव देशपांडे सभागृहात जेव्हा हे उभयता भेटले, तेव्हा मला बघताच त्यांनी अमृताजींना लगेच सांगितले "बघ ते अविनाशजी तुझ्या मुलाखतीचा अंक घेऊन आले आहेत" मग अमृताजींच्या हातात मी तो अंक सोपवला होता.
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा ते आवर्जून चौकशी करायचे. २०१७ पासून त्यांनी दिवाळीत पत्रकारांना सपरिवार बोलवायला सुरुवात केली. मग सुरुवातीला पत्रकारांशी जी बातचीत व्हायची, ती बंद करून त्यांनी सांगितले की यावेळी मी पत्रकारांशी बोलणार नाही तर तुमच्या कुटुंबीयांशीच बोलणार, आणि सर्व पत्रकारांच्या पत्नी मुले यांच्याशी त्यांचा संवाद व्हायचा. २०१७ च्या स्नेहभोजनाच्या वेळेस मी त्यांना माझी शाळा हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात येण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा मी नक्की येणार असे त्यांनी आश्वस्त केले. ठरल्याप्रमाणे ते कार्यक्रमाला आले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की मला नागपुरात आणि मुंबईत या शाळेचे इतके माजी विद्यार्थी भेटत होते ,आणि आठवण देत होते त्यामुळे मी हे निमंत्रण नाकारणे शक्यच नव्हते. त्यावेळी कोणी कोणी आठवण दिली त्यात माझा देखील नामोल्लेख त्यांनी केला होता.
२०१९ मध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नवेच राजकारण घडवले. परिणामी देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते झाले. मग विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांच्या भेटी होऊ लागल्यात. २०२१ च्या जानेवारी महिन्यात नाशिकच्या पत्रकार संघटनेने मला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते. कार्यक्रमाच्या थोडा वेळ आधी मी कार्यक्रम स्थळी पोहोचलो. तिथे सभागृहाच्या बाजूलाच असलेल्या एका दालनात मला बसवण्यात आले. माझ्यासोबत तिथले काही माहिती खात्याचे अधिकारी देखील होते. तितक्यात देवेंद्रजी तिथे येऊन पोहोचले. मला बघताच ते लगेच म्हणाले "अरे अविनाशजी तुम्ही नागपूरहून इथे कसे काय?" तेव्हा मीही मिश्किलपणे उत्तर दिले, "नागपुरात तुम्ही भेटत नाही म्हणून भेटायला इथवर यावं लागलं" तर लगेच त्यांनी "जाऊ द्या माझ्या फिरक्या घेऊ नका" असे म्हणत माझ्या बाजूला येऊन बसले आणि गप्पा सुरू केल्या.
२०२२ च्या जून महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर लगेचच नागपुरात आले असताना प्रेस क्लब मध्ये आम्ही भेटलो होतो. नंतर सुमारे महिनाभराने नागपुरात त्यांच्या निवासस्थानीच असलेल्या कार्यालयात आमची भेट झाली. तिथे थोडा वेळ गप्पा देखील झाल्या.
२०२३ च्या डिसेंबर महिन्यात देवेंद्र यांची चुलत बहीण भावना खरे हिच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता. तिथे आम्ही निमंत्रित होतो. आम्ही तिथे पोहोचलो आणि थोड्याच वेळात साईरन वाजवत देवेंद्रजी येऊन पोहोचले. त्यावेळी थोड्याच दिवसात राम मंदिराचे लोकार्पण होणार होते. त्यासाठी त्यावेळी एका दैनिकाच्या विशेषांकाचे संपादन मी करत होतो. त्यासाठी मला देवेंद्रजींचा कारसेवेतील अनुभवावरचा लेख हवा होता. तिथेच मी त्यांना विनंती केली. लगेचच त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोलून लेख घ्यायला सांगितले. ठरल्याप्रमाणे त्यांचा लेख घेतला आणि अंक प्रकाशित झाल्यावर नागपुरात त्यांना अंक देखील पोहोचवून दिला होता.
राम मंदिराच्या लोकार्पणानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्रजींच्या भेटी झाल्या. मात्र त्या खूप घाई गडबडीत होत्या. फुरसतीत बोलणे असे झालेच नाही. मग ते देखील विधानसभेच्या तयारीत लागले. त्यामुळे त्यानंतर भेटी झाल्याच नाहीत.
दुर्दैवाने १ ऑगस्ट२०२४ पासून मी खूप आजारी झालो. जवळजवळ सहा महिने आडवा होतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या भेटीचा योग आलाच नाही. विधानसभा निवडणुकीत मतदान करायला मी व्हीलचेअर वर गेलो होतो. व्हिलचेअरवर जाऊन मतदान करून आल्यानंतरचा माझा फोटो सगळीकडे व्हायरल झाला. ते कळल्यावर देवेंद्रजींनी माझ्या प्रकृतीची चौकशी केल्याचेही कळले. अविनाशजींना लवकरच भेटायला येतो असा निरोपही त्यांनी पाठवला होता. अर्थात नंतरच्या घडामोडीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
मात्र निवडणूक निकालानंतर देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. लगेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी त्यांना अधिवेशनात भेटायलाही जाऊ शकलो नाही. आपल्या व्यस्ततेत ते देखील माझी चौकशी करू शकले नसावे.मात्र आता हिंडता फिरता झालो आहे. लवकरच आमच्या भेटीचा योग येईल अशी आशा आहे.
एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देवेंद्रजींचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्याचप्रमाणे गंगाधररावांचा मुलगा ते दिविजाचे बाबा हा प्रवास देखील मी बघितला आहे. आज देवेंद्रजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना देखील अंगावर घेऊन धोबीपछाड देण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे आणि उद्या भविष्यात ते राष्ट्रीय स्तरावर देखील आपले कर्तृत्व सिद्ध करतील यात शंका नाही. त्यांना त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

