shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोहलीच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीची सतरा विराट वर्ष


                भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००८ मध्ये १८ ऑगष्ट याच दिवशी कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि येथून त्याचा महान प्रवास सुरू झाला. त्याच्या कारकिर्दीत कोहली सन २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता आणि त्याने ५० षटकांच्या प्रारूपात सर्वाधिक शतके झळकविली आहेत. कोहलीच्या कारकिर्दीत अनेक नेत्रदिपक खेळी या दरम्यान क्रिकेट जगताला पहायला मिळाल्या आहेत आणि आजही मैदानावर त्याचे वर्चस्व अबाधित आहे.

                विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु पहिल्या सामन्यात तो केवळ १२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही आणि नवीन उंची गाठली. क्रिकेट जगतात किंग कोहली आणि धावांचं यंत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराटने असे अनेक विक्रम केले आहेत जे मोडणे कठीण आहे. त्याला अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला, विशेषतः जेव्हा तो फॉर्ममध्ये नव्हता. त्याची वचनबद्धता, क्रिकेटबद्दलची आवड आणि कठोर परिश्रम त्याला नवीन उंचीवर घेऊन गेले. त्याच्या १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, त्याने किकेटच्या तिन्ही प्रारूपात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो सन २०११ एकदिवसीय विश्वचषक, सन २०१३ आणि सन २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सन २०२४ टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे.

               विराटची बॅट तिन्ही प्रारूपात चांगलीच तळपली आहे. पण एकदिवसीय सामन्यात तो जरा वेगळ्या रंगात दिसतो. कोहलीने या फॉरमॅटमध्ये अनेक पराक्रम केले आहेत. तो सन २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता, तर २०१३ आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघातही त्याचा समावेश होता. सन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. त्या स्पर्धेत त्याने ७६५ धावा केल्या, ज्या एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा आहेत. दुर्देवाने भारत त्या स्पर्धेत अंतिम सामान्यात पराभूत झाला. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत कोहलीने ५५८ धावा केल्या, ज्या कोणत्याही खेळाडूने एका मालिकेत केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. या प्रकारात पन्नासावर (५१) शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. या प्रकारात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. त्याच वेळी, तो एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ८०००, ९०००, १००००, ११०००, १२०००, १३००० आणि १४००० धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

               कोहलीने सन २०१० मध्ये टी२० मध्ये पदार्पण केले आणि सन २०११ मध्ये कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. परंतु आता त्याने या दोन्ही प्रारूपांना निरोप दिला आहे. गेल्या वर्षी टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आणि या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने लाल चेंडूच्या स्वरूपातूनही निवृत्तीची घोषणा केली. तो आता भारतासाठी फक्त एकदिवसीय जर्सीमध्ये दिसणार आहे. कोहलीचे डोळे सन २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यावर आहेत यात शंका नाही. तिन्ही स्वरूपे एकत्रित करून, कोहलीच्या नावावर ८२ शतके आहेत आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकरनेच केवळ त्याच्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

                भारताची पुढील एकदिवसीय मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली जाईल, जिथे कोहली कर्णधार रोहित शर्मासोबत खेळताना दिसेल. कोहली प्रमाणेच रोहित शर्मानेही यापूर्वी कसोटी आणि टी-२० क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.

                कोहली शेवटचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतासाठी खेळला होता. त्या स्पर्धेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकणारी शतकी खेळी केली, तर सेमीफायनलमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची दमदार खेळी केली आणि संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

                 सध्या इंग्लंडमध्ये कुटुंबा समवेत असलेला कोहली तेथे क्रिकेटचा सरावही करत आहे. तसे बघाल तर कोहली आजमितीला जगातील सर्वात चपळ व तंदुरूस्त खेळाडू आहे. अनेक तज्ञांच्या मते तो किमान पाच वर्ष सर्वच प्रारूपात देशाचे प्रतिनिधित्व करु शकतो. परंतु देशात सध्या नवोदित व गुणवान खेळाडूंची होत असलेली आवक बघता त्याने स्वतःहून म्हणा किंवा निवड समितीच्या सांगण्यावरून म्हणा छोट्या व मोठ्या प्रारूपातून निवृत्ती घेतली असून मध्यम प्रारूपात त्याचे आव्हान अजून कायम आहे. सन २०२७ चा वनडे वर्ल्ड कप व ऑलिंपिक स्पर्धा त्याचे लक्ष आहे. पण निवड समिती इतकी मोठी संधी देईल असे सध्या तरी वाटत नाही. तेंव्हा क्रिकेट रसिकांनी या अदभूत खेळाडूची छबी व शानदार खेळ तो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय पटलावर खेळेल तो पर्यंत आपल्या नयनचक्षूत सामावून घ्यावा.

@ डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close