शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार ता.२८/०८/२०२५
अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड समाज बांधवांचा समर्थन लाभत असून प्रत्येक जिल्ह्यात शेकडो समर्थक जरांगे यांच्या ताफ्यात सामील होत आहेत. बुधवारी संध्याकाळी जरांगे यांचा ताफा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावात दाखल झाला. यावेळी जेसीबी मशीनच्या लोडरमधून पुष्पृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या प्रवासामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री रावसाहेब दानवे यांची शिर्डीत भेट झाली. त्यांच्यात शासकीय विश्रामगृह येथे बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय सुरू होतं? याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जरांगे यांचा ताफा नगर जिल्ह्यात दाखल होत असताना ही गुप्त बैठक घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना शासन अडचणीत सापडल्याचे बोलले जात असताना, वरिष्ठ नेतेमंडळींनी घेतलेली ही बैठक भविष्यातील धोरण आखणीसाठी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर ताण वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर विखे –दानवेंची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. पुढील काही तासात जरांगे यांचा ताफा नगर जिल्ह्यातील विविध भागातून प्रवास करत आळेफाटा येथे जाणार आहे. पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दानवेंच्या भेटीनंतर विखेंची प्रतिक्रिया.....
रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "मनोज जरांगे पाटलांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू. शिंदे समितीला पूर्ण अभ्यास करण्यासाठी कालावधी दिला पाहिजे. हीच जरांगेंना विनंती आहे. रावसाहेब दानवे हे व्यक्तिगत कामासाठी आले आणि वैयक्तिक भेट झाली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर चर्चा झाली नाही", असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलं.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?......
"लोकशाहीत सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र आंदोलन करताना इतरांना त्रास होवू नये, शांततेत आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आंदोलन करावे. आरक्षण मिळावे यासाठी आमचा आणि सरकारचा पाठिंबा आहे. फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले होते. राज्यात सत्तांतरानंतर मविआने सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवले. आता नव्याने आरक्षणाची मागणी होतेय. सरकार काही मुद्द्यांवर अभ्यास करतंय. शिंदे समितीची नियुक्ती झालीय, त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. शिंदे समितीच्या अहवालाची वाट बघितली पाहिजे. कुणी एक माणूस हे विषय ठरवू शकत नाही. समितीच्या शिफारशीवर पुढील कारवाई होईल", अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600