आशिया चषक क्रिकेट स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर हि आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या आयसीसीच्या मान्यताप्राप्त संघांमध्ये खेळली जाणारी एक मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. सन १९८४ मध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरूवात झाली आणि शुभारंभाची हि स्पर्धा सुनिल गावस्कर यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकली होती. अर्थात त्यावेळी टी२० क्रिकेटचा जन्मही झाला नसल्याने ती एकदिवसीय प्रारूपात शारजात खेळली होती. त्यानंतर टी२० चा उदय होईपर्यंत ती सातत्याने वनडे स्वरूपातच खेळली जात असे. यातील विजेत्याला आपोआप आशिया खंडातील महाशक्ती म्हणून ओळखले जाते.
मात्र टी२० चा जन्म झाला आणि या स्पर्धेचं स्वरूप परिस्थितीनुसार बदललं जाऊ लागलं. या स्पर्धेनंतर आयसीसीची सफेद चेंडूची जी स्पर्धा असेल, जसं वनडे किंवा टी२० त्या धर्तीवर आशिया चषक स्पर्धा खेळली जाते. म्हणजे या स्पर्धेकडे आशिया खंडातील संघ विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणूनच बघतात, असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, भारत हा आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने आतापर्यंत ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे, ज्यात २०२३ मधील शेवटचे विजेतेपद समाविष्ट आहे. भारत हा आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे, भारताने तब्बल आठ वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने सन २०२३ मध्ये जिंकलेला आशिया चषक वनडे प्रारूपातील होता.
आशिया चषक एकदिवसीय आणि टी२० स्वरूपात आलटून पालटून खेळला जातो. सन २०१६ पासून टी२० स्वरूप दर दोन वर्षांनी खेळवले जाते, तर एकदिवसीय स्वरूपही दर दोन वर्षांनी खेळवले जाते. यंदा होणारी ही आशिया चषकाची १७ वी आवृत्ती असेल आणि ती ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित केली जाईल मात्र तिचे मुळ यजमानपद भारताकडे असेल.
आशिया चषक २०२५ ही टी२० फॉरमॅटमध्ये खेळली जाणार. याआधी या प्रारूपात ती दोनदा खेळली गेली आहे. सन २०१६ मध्ये पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता आणि शेवटची टी२० आशिया चषक स्पर्धा २०२२ मध्ये खेळविण्यात आली होती. म्हणून प्रस्तत लेखात आपण फक्त टी२० फॉरमॅटबद्दल चर्चा करणार आहोत. महेंद्रसिंग धोनी या फॉरमॅटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
तसं बघाल तर महेंद्रसिंग धोनी या प्रारूपातीलच नाही तर सर्वच प्रारूपातील विश्वविजेता कर्णधार आहे. वनडे, टी२० चा विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटीत आयसीसीचे अव्वल मानांकनाची गदा हे सर्व विजेतेपद मिळविणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्यामुळे त्याचा आदर्श घेऊन तशी कामगिरी करायला जगातील सर्वच कर्णधार आतुर झालेले आहेत.
आशिया चषकाच्या टी-२० प्रारूपाबद्दल बोलायचे झाले तर, पहिला हंगाम भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. या फॉरमॅटमध्ये, धोनीने कर्णधार म्हणून एकही सामना गमावलेला नाही आणि तो ५ सामने जिंकून या यादीत अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शनाकाने या फॉरमॅटमध्ये ६ सामन्यांत ५ विजय मिळविले आहेत, जो धोनीच्या बरोबरीचा आहे. मात्र धोनीने ५ पैकी ५ सामने जिंकले असल्याने व शनाकाने एक सामना गमावला असल्याने धोनीचे अव्वल स्थान अबाधीत आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमला सन २०२५ च्या आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु या फॉरमॅटमध्ये विजयांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर या यादीत बांगलादेशचा कर्णधार मुश्रफा मोर्तझा चौथ्या क्रमांकावर आहे. मोर्तझाने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने टी२० प्रारूपात ३ सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत.
टीम इंडिया, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया चषक २०२५ मध्ये खेळणार आहे. अशा परिस्थितीत, त्याच्याकडे धोनीचा हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. जर तो आशिया कप राखण्यात यशस्वी झाला तर तो धोनीला मागे टाकू शकतो. सध्या तरी भारतीय संघ इतर सर्व सहभागी संघांच्या तुलनेत उजवा गणला जातो. शिवाय भारत टी२० चा विद्यमान विश्वविजेता असल्याने संभाव्य विजेता म्हणूनच अनेक तज्ञांची पहिली पसंती भारतालाच आहे. अशा अनुकूल परिस्थितीचा लाभ घेऊन सुर्यकुमार यादवला सात सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्याला किमान आशिया चषकाच्या टी २० प्रारूपात सर्वात यशस्वी कर्णधार ठरण्याची संधी उपलब्ध आहे व तीही एकाच स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.