जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मराठीत एक संतवचन आहे *"पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. जयाचा तिन्ही लोकी झेंडा...*
हे संत वचन खरे ठरवणारे मध्य भारतातील आघाडीचे उद्योजक आणि व्यावसायिक आहेत अजय शक्तीकुमार संचेती..
कै. शक्तीकुमारजी म्हणजेच शक्तीभाऊ संचेती हे एक आघाडीचे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांनी एका काळात अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करत बांधकाम व्यवसायात स्वतःचा एक दबदबा निर्माण करत एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर्स नावाची मोठी कंपनी उभारली. शक्तीभाऊंचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या या कंपनीचा आर्थिक उलाढाल वर्षाला दोन हजार कोटी इतकी होती यावरून त्यांचा आवाका लक्षात यावा.
शक्तीभाऊंंचा हा व्यवसाय त्यांचे अजय आणि आनंद या दोन पुत्रांनी वाढवला आज एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चरचा व्याप जबरदस्त वाढलेला आहे. त्यात अजय संचेतींचे नियोजन आणि जनसंपर्क यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजयजींनी फक्त व्यवसायच वाढवला असे नाही तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील आपले स्थान निर्माण केले. विविध संस्था आणि संघटनांमध्ये देखील ते सक्रिय आहेत. इतकेच काय तर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे देखील ते दीर्घकाळ सदस्य होते. २०१२ ते २०१८ या कालखंडात ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा राहिले आहेत.
संचेती परिवाराचा आणि माझा संबंध साधारणतः १९९४ मध्ये आला. त्यावेळी शक्तीभाऊंचे चुलत बंधू म्हणजेच अभय संचेती यांच्या एका कामाच्या निमित्ताने या सर्वांची ओळख झाली होती. त्यावेळी संचेतींच्या शिवाजी नगरच्या घरी प्रत्येक भेटीत अजय संचेती तिथे असायचेच. त्यामुळे हळूहळू आमचा परिचय वाढत गेला.
१९९५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हे संचेती परिवाराचे मुळ गाव त्यावेळी शक्ती कुमारजींचे बंधू म्हणजेच अजय संचेतींचे काका चैनसुख संचेती मलकापुरातून विधानसभेची निवडणूक लढवणार होते. वस्तूतः ते भाजपचे कार्यकर्ते, पण तिथल्या राजकारणामुळे यांना उमेदवारी नाकारली. मग त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला माझ्या हातात कोणतेही असे काम नव्हते. त्यामुळे मलकापूरला जाऊन निवडणूक प्रचारात प्रसिद्धी यंत्रणा सांभाळावी म्हणून मला विचारले गेले. मी सुद्धा तात्काळ होकार दिला. मग मलकापूरला जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागपूरला येऊन शक्तीभाऊंना पूर्ण कल्पना दिली आणि योजनाही सांगितली. त्यांनी लगेच होकार दिला आणि मी कामाला लागलो. त्या पूर्ण नियोजनात माझा आणि अजय संचेतींचा नियमित संपर्क सुरू झाला.
या निवडणुकीत मी पूर्ण प्रसिद्धी यंत्रणा सांभाळली होती. सर्वांच्याच सहकार्यामुळे चैनसुख संचेती अपक्ष उमेदवार असूनही तब्बल १२००० च्या मताधिक्याने विजयी झाले.
मग मी संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर चैनसुख संचेतींची प्रसिद्धी यंत्रणा सांभाळावी असा प्रस्ताव शक्तीभाऊंनी दिला. मी देखील त्याला तयार झालो यावेळी मात्र माझे सगळे आर्थिक व्यवहार अजय संचेतींबरोबरच होत होते. तिथून मला त्यांच्या संघटन कौशल्याची आणि नियोजन पद्धतीची चांगलीच ओळख झाली. हळूहळू आमची दोघांची चांगलीच मैत्री जमली.
तेव्हापासून म्हणजे जवळजवळ तीस वर्षापासून आमचा दोघांचाही संबंध आहे. या संबंधात त्याच्यातले असंख्य गुण लक्षात आले. त्यांचा व्यापक ज्यांना संपर्क आणि लहानातल्या लहान माणसाला देखील आपल्याशी जोडून ठेवण्याचे त्यांचे कसब हे निश्चितच दाद देण्याजोगे आहे. त्यामुळे त्यांची अनेक कामे व्यक्तिगत संपर्काच्या जोरावर फटाफट पूर्ण होतात. अर्थात ज्यांच्याकडून ते मदत घेतात त्यांना कायम अजयभाऊ मदतीचा हात देत असतात. परिणामी त्यांच्यावर काही वेळा अति खर्चिक असल्याचा देखील आरोप केला जातो. त्यांचे वडील स्वर्गीय शक्तीभाऊ संचेती नेहमी म्हणायचे "अजय कोणालाही आर्थिक मदत करायला ताबडतोब तयार असतो. मात्र त्यामुळे त्याचे झालेले संबंध जे आहेत त्याच्या जोरावर त्याची अनेक कामे चुटकीसरशी होतात." त्यांचे हे म्हणणे खरे ठरावे असाच अजय भाऊंचा स्वभाव आहे. विशेष म्हणजे व्यवसायासाठी कोणाला लाच देणे अशातला त्यांचा प्रकार नाही तर प्रत्येक माणसाच्या गरजेच्या वेळी आपण धावून जायचे मग भलेही तो उपयोगाचा असो किंवा नसो हे त्यांच्या स्वभावातले वैशिष्ट्य मला इतके वर्षात आढळून आले आहे.
चैनुभाऊंचे काम करताना अनेकदा वेगवेगळ्या अडचणी यायच्या. अजय भाऊंचे माझ्या कामावर लक्ष असायचे. माझ्या अडचणी ते मी काही न बोलताच दूर करून द्यायचे. मी व्यक्तिगत स्तरावर देखील कोणत्याही अडचणीत आलो आहे असे दिसले की ते तत्काळ मदत करायला यायचे. मुंबईत मी चैनुभाऊंच्या काही कामाने गेलो असताना सोबत माझी पत्नी देखील होती. योगायोगाने तिथे अजय भाऊ देखील आले होते. मग चैनू भाऊ मी आणि अजय भाऊ एकत्रच फिरत होतो. बोलण्या बोलण्यात माझ्यासोबत माझी पत्नी देखील आली आहे हे अजय भाऊंना कळले. त्यांनी निघताना तात्काळ माझ्याजवळ काही रक्कम देऊन ठेवली आणि सांगितले पाठवले "पाठकजी, वहिनी सोबत आला आहात तर खरेदीसाठी हे पैसे राहू द्या." मी नाही म्हणत असतानाही त्यांनी जबरदस्तीने पैसे दिले. त्यामुळे मुंबईची आमची ट्रिप लक्षणीय राहिली होती. माझ्या मुलीचा जन्म झाल्याचे कळले तेव्हा न मागताही त्यांनी माणसाकडे काही आर्थिक मदत दवाखान्यात पाठवून दिली होती. असे प्रत्येक वेळी काही आजारपण असले, काही सुखदुःखाचे प्रसंग असले, की ते लगेचच मदत पाठवून द्यायचे. प्रसंगी फोन करून चौकशी देखील करायचे. त्यामुळे संबंध अजूनच पक्के होत गेले.
२००१ मध्ये काही कारणाने मी चैनुभाऊंचे काम करणे बंद केले. त्यामुळे मी जी काही वृत्तपत्रांची कामे करत होतो आणि त्यातून जे काही तूटपुंजे मानधन मिळत होते त्यावर मी भागवत होतो. अजय भाऊंना हे कळल्यावर एक दिवस त्यांनी मला बोलावून घेतले. त्यावेळी ते महावीर इंटरनॅशनल या संस्थेचे मानद सचिव म्हणून निवडले गेले होते. सचिवाचे काम हे ऑफिस ते काम सांभाळणे असे असते. त्यांनी मला बॅक ऑफिस सपोर्ट म्हणून मदतीला घेतले. मग महावीर इंटरनॅशनल मध्ये जाऊन मी तिथे देखरेख करू लागलो. आणि तिथला पत्र व्यवहार इतर व्यवहार हे सगळे बघून अजय भाऊंना माहिती देऊ लागलो. त्याचा आर्थिक मोबदला देखील ते मला देत होते. त्यामुळे मलाही भक्कम आधार मिळाला होता.
२००२ मध्ये मी एक पाक्षिक सुरू केले. त्याची पहिली जाहिरात मागण्यासाठी मी अजय भाऊ कडेच गेलो. त्यांनी तात्काळ माझ्या पत्रावर जाहिरात मंजूर केली आणि लगेच त्यांच्या ऑफिसला चेक बनवून द्यायला सांगितला. पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या यशामुळे मी चांगलाच सुखावलो होतो. त्यानंतर दरवर्षी दिवाळी अंकासाठी मी त्यांना जाहिरात मागत असे, आणि ते विना तक्रार देत असत. त्यांच्या जाहिरातीमुळे माझे अडलेले काम पुढे सरकायला मदत होत असे.
अजय भाऊंचे जरी ते संघ आणि भाजपाशी जवळीक ठेवून असले तरी सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांची त्यांचे जवळकीचे संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या घरी दरवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात एक सत्यनारायण होत असे. या सत्यनारायणाला अजय भाऊंच्याच संबंधातून अगदी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मान्यवर हजेरी लावायचे. आजचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांचे आणि अजय भाऊंचे अगदी जवळीकीचे संबंध आहेत. अजय भाऊंचे वडील शक्तीभाऊ संचेती वारले तेव्हा राजनाथ सिंह जी खास दिल्लीहून त्यांना भेटायला आले होते. गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन विलास मुत्तेंमवार विजय दर्डा अशी सर्वच मान्यवर मंडळी त्यांच्या घरी येता जाता हजेरी लावून जातात. त्यासाठी फक्त अजयभाऊंचेच संबंध कारणीभूत होते असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी आणि अजय भाऊ संचेती यांचे अगदी मैत्रीच्या संबंध आहे. त्यामुळे नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्यांनी देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास कसा करता येईल हे ठरवण्यासाठी अजय संचेतींना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतले. पुढे २०१२ मध्ये त्यांनी अजयभाऊंना महाराष्ट्रातून राज्यसभेत सुद्धा सदस्य म्हणून पाठवले.
अजयभाऊ राज्यसभा सदस्य झाल्यावर त्यांचा मराठी पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली होती. व्यवसायामुळे त्यांचे इंग्रजीवर निश्चित प्रभुत्व होते आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मराठीत ड्राफ्टिंग करणारा असा कोणी नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या पत्रांवर काय कारवाई करायची त्याच्या सूचना लिहून देऊन तो गठ्ठा माझ्याकडे येत असे. मग मी माझ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर त्याची संबंधितांना पत्रे पाठवून पत्रे बनवून अजय भाऊंच्या ऑफिसला ई-मेलने पाठवत असे. जवळजवळ सहा सात वर्ष हा कार्यक्रम चालू होता. त्या काळात ते अधून मधून मला बोलावून घ्यायचे आणि राजकीय विषयांवर देखील आमची चर्चा होत असे
एकदा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर निवडणुकी संदर्भातील चर्चेत सहभागी होण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. मात्र ऐन वेळेवर बोलावल्यामुळे गाड्यांचे आरक्षण मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे मी नकार कळवण्याच्या मानसिकतेत होतो. ज्यावेळी अजयभाऊना हे कळले त्यावेळी त्यांनी लगेचच "पाठक जी तुम्ही विमानाने जा मात्र ही संधी सोडू नका तुमचे विमानाचे तिकीट मी मॅनेज करतो" असे म्हणून लगेच ऑफिसला माझी तिकीट बुक करायला सांगितले आणि मला दूरदर्शनच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाऊंनी पाठवले होते. त्यानंतर मला बऱ्याच वाहिन्यांवर चर्चेसाठी बोलावले जाऊ लागले. अजय भाऊंनी मला पुढे केल्यामुळेच नंतर हे शक्य झाले होते.
माझी मुलगी बारावी पास झाली जेव्हा हे कळले तेव्हा भाऊंनी मला तिला ऍडमिशन कुठे देणार काय याबाबत विचारले. मी त्यांना माहिती देताना बोलता बोलता विशिष्ट कोर्सला पाठवले तर आर्थिक भार जास्त पडेल, त्यामुळे आम्ही विचारात आहोत असे बोललो. तेव्हा "तुम्ही आर्थिक समस्येची चिंता करू नका, मी सांभाळून घेईन," असे सांगितले आणि त्यांनी आपला शब्द पाळला. माझी मुलगी एम टेक होईपर्यंत प्रत्येक वेळी ते हातभार लावत राहिले होते. आज त्यांच्यामुळेच माझी मुलगी एम टेक होऊ शकली हे नमूद करायलाच हवे.
अजयभाऊ एक चांगले प्रशासक तर आहेतच, पण त्याचबरोबर ते चांगले समाजकारणी देखील आहेत. सामाजिक क्षेत्रात ते सातत्याने सक्रिय दिसतात दररोज सकाळी त्यामुळेच त्यांना भेटायला येणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येकाला शक्य होईल ती मदत ते करत असतात. अनेकदा त्यांच्यासोबत बसलो असताना या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत.
एकदा माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी पाठकजींच्या माझ्या संबंधांमुळे मला कशी मदत होते हेच भाषणात सांगितले होते. माझ्यासारख्या सामान्य माणसाचे त्यांनी गुणगान गावे हा त्यांचा मोठेपणाच होता.
माझे थोडं आंबट थोडं गोड या पुस्तकाचे प्रकाशन कोरोना काळात नितीन गडकरींच्या घरी त्यांच्या हस्ते करायचे ठरले होते. त्यावेळी फक्त चार जण या असा निरोप होता. त्यामुळे मी माझी पत्नी माझा एक मित्र डॉक्टर उदय बोधनकर आणि अजय संचेती हे आले होते. अजय संचेती त्या काळात खूप व्यस्त होते. तरीही मी म्हटल्यावर ते लगेच आले. कोरोना काळात अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना कामावरून काढले गेले होते. त्यामुळे पत्रकारांची अवस्था त्या काळात वाईटच होती. नितीन गडकरी त्यावेळी अनेक पत्रकारांना मदतीचा हात देत होते. माझे पुस्तक प्रकाशन आटोपल्यावर नितीनजींनी मला सांगितले की तुझी काहीही अडचण असली तर नि:संकोच मला कळवत जा, मी काही बोलण्याच्या आताच अजयभाऊ उद्गारले नितीनजी पाठकजींची सर्व काळजी मी घेतो तुम्ही चिंता करू नका. आणि तो शब्द ते वेळोवेळी पाळतही होते.
माझे दृष्टिक्षेप आणि सत्तेच्या सावलीत या दोन पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले. त्यावेळी राज्यपालांसोबत लक्ष्मीनारायण भाला अजय संचेती आणि डॉ. उदय निरगुडकर हे वक्ते होते. तेव्हाही अत्यंत व्यस्ततेत असतांनाही त्यांनी वेळ काढला होता. यावेळी बोलताना त्यांनी अविनाश पाठक हे एक चांगले पत्रकार साहित्यिक आणि संघटक देखील आहेत मात्र त्यांना योग्य ती संधी मिळाली नाही आणि त्यांच्यातल्या गुणांचे योग्य ते चीज झाले नाही असे त्यांनी जाहीर रित्या सांगितले होते.
गत वर्षी मी गंभीररित्या आजारी झालो होतो. त्याबद्दल कळतच त्यांनी योग्य ती मदत करण्याचा निरोपही पाठवला होता. ते स्वतः किंग्जवे हॉस्पिटलमध्ये बोलले देखील होते. नंतरही ते सातत्याने माझी चौकशी करत होतेच.
असे अजयभाऊ संचेती आज २२ ऑक्टोबर रोजी वयाची साठ वर्षे पूर्ण करीत ६१ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे आणि त्यांच्या हातून अशी अनेक सत्कार्य घडावीत, इतकेच प्रभु चरणी मागणे आहे.
आज ते जवळजवळ चार हजार कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांचे संचालक आहेत. शिवाय राजकीय क्षेत्रात देखील त्यांची जबरदस्त प्रतिष्ठा आहे. तरीही माझ्यासारख्या सामान्य माणसाशी ते संबंध ठेवतात आणि जपतात सुद्धा हे मी माझे भाग्यच समजतो.

