shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीडच्या एकीचा 'केज पॅटर्न'! डॉ.संपदा मुंडेच्या हत्येविरोधात सर्वधर्म-सर्वपक्ष एकवटले; बिहारशी तुलना करणाऱ्यांना 'कॅन्डल मार्च' मधून सडेतोड उत्तर ​

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :

​बीड जिल्ह्यात जाती-जातीत वाद आणि भांडणे असल्याची चर्चा, अफवा असल्याचं केजकरांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. बीडची लेक असलेल्या  डॉक्टर संपदा मुंडे या महिलेची फलटण येथे झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ केज शहरात काल कॅन्डल मार्च, निषेध मोर्चा काढून आणि उग्र निदर्शने करून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले.

​या कॅन्डल मार्च मध्ये सर्वधर्मिय, सर्वपक्षीय आणि सर्व जाती-समुहांनी एकत्र येत दु:ख आणि संताप व्यक्त केला.

​ एका लेकीसाठी सारा बीड जिल्हा एकवटला

​केज शहरात काल संध्याकाळी  दि.29/10/2025 बुधवार बस स्टॅन्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक निघालेल्या कॅन्डल मार्च मध्ये नागरिकांचा ,युवकांचा व मुलींचा उत्स्फूर्त सहभाग होता. समाजात असलेले सर्व मतभेद, पक्षभेद आणि जातीय भिंती विसरून केजकर एका लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.




​केजकरांचा संदेश: "वेळ येते, बीडवर जेव्हा अन्याय होतो, बीडकर आया-बहिणीवर जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा आम्ही सर्व भेद विसरून एकत्र येतो. या एकीचा संदेश कालच्या कॅन्डल मार्च ने संपूर्ण महाराष्ट्राला दिला गेला आहे."

​ 'गुंडगिरीचा शिक्का' नको;      बीडकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला!

​केजकरा़ंच्या या एकीमुळे बीड जिल्ह्यावर होणाऱ्या गुंडगिरीच्या आणि बिहारशी होणाऱ्या तुलनेच्या आरोपांना सडेतोड उत्तर मिळाले आहे.                              

सदरील कॅन्डल मार्च मध्ये हारुण भाई इनामदार, सिताताई बनसोड, भगवान केदार, सुमंत धस, भोसले सर, भाई मोहन गुंड, पञकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

​"बीड हा कष्टकरी, मेहनती, प्रामाणिक, आणि साध्या-भोळ्या, गरीब जनतेचा जिल्हा आहे. तेव्हा कृपया आमच्यावर गुंडगिरीचा शिक्का मारू नका. मूठभरांच्या वाह्यातपणामुळे संपूर्ण जिल्ह्याला बदनाम करू नका," अशी कळकळीची विनंती बीडच्या नागरिकांनी संपूर्ण महाराष्ट्राला केली आहे.

​केजमधील या अभूतपूर्व एकीमुळे जिल्ह्याला बदनाम करू पाहणाऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त होतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. बीडच्या या एकीचा आणि स्नेहभावाचा हाच 'केज पॅटर्न' कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लेखक :

प्रकाश मुंडे, शिक्षक कॉलनी केज.मो.9764922284.

close