सध्या वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला असून दौऱ्यातला पहिला कसोटी सामना जगातले सर्वात मोठे व भव्य क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. प्रत्यक्षात हि मॅच नव्हती तर पूर्ण मिस मॅच होती हे झालेला खेळ व लागलेला निकाल यावरून स्पष्ट दिसून आले. दोन्ही संघांचा दर्जात जमीन आसमानाचा फरक असल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अहमदाबादची खेळपट्टी, भारताची जलद व फिरकी गोलंदाजी बिलकुलच समजली नाही तर भारतीय फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांच्या मर्यादाच जगासमोर उघड्या पाडल्या. वेस्ट इंडिज फलंदाजी इतकी ठिसूळ झाली की, भारताने केलेल्या धावा त्यांना स्वतःच्या दोन डावात मिळूनही करता आल्या नाहीत, कदाचित आणखी एक डाव खेळला असता तरी त्या ओलांडता आल्या नसत्या अशी परिस्थिती होती.
त्या उलट भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दोन्ही डावात विंडीज फलंदाजांना श्वास घेण्याइतकीही उसंत दिली नाही. तर ४४८ धावात तीन फलंदाजांनी शतकी तडाखा देऊन विंडीज गोलंदाजांना हतबल केले. याच पार्श्वभूमीवर येत्या १० ऑक्टोबरपासून दिल्ली स्थित अरूण जेटली स्टेडियमवर मालिकेतला दुसरा व शेवटचा कसोटी सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असलेली हि मालिका भारतासाठी आपले गुणांकन वधारून घेण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. भारत सद्यस्थितीत तिसऱ्या तर विंडीज शेवटच्या स्थानावर आहे. भारत पहिल्या दोन डब्ल्यूटीसी स्पर्धांचा उपविजेता राहिला असून आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.
अरुण जेटली स्टेडियम हे भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्स नंतर हे सर्वात जुने स्टेडियम आहे. सन १८८३ मध्ये बांधलेले हे स्टेडियम फिरोजशाह कोटला म्हणून ओळखले जात असे. सन २०१९ मध्ये फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे ठेवण्यात आले. तेव्हापासून ते अरुण जेटली स्टेडियम म्हणून ओळखले जाते.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमने अनेक ऐतिहासिक विक्रम केले आहेत. भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेतल्या. या मैदानाच्या बांधकामासाठी ११४.५ कोटी रुपये खर्च आला. येथे ५५,००० प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. अरुण जेटली स्टेडियमवरील सर्वात लांब सीमारेषा ७२ मीटर आहे आणि सर्वात लहान सीमारेषा ५६ मीटर आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर पहिला कसोटी सामना १० ते १४ नोव्हेंबर १९४८ रोजी वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळला गेला. या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ६४४ आहे, जी ६ फेब्रुवारी १९५९ रोजी वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध केली. या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी सांघिक धावसंख्या ७५ आहे, जी २५ नोव्हेंबर १९८७ रोजी भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध केली. या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा सर्वोत्तम सांघिक धावसंख्या ६१३ आहे, जो २९ ऑक्टोबर २००८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला.
फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या २४३ आहे, जी विराट कोहलीने २ डिसेंबर २०१७ रोजी श्रीलंकेविरुद्ध केली. अनिल कुंबळेने ४ फेब्रुवारी १९९९ रोजी पाकिस्तानविरुद्ध या मैदानावर कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेतले.
सन १९४८-४९ च्या हंगामात कोटलात पहिला कसोटी सामना आयोजित केला होता, जेव्हा जॉन गोडार्डच्या नेतृत्वाखालील बलाढ्य वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती आणि या मैदानाने काही उत्कृष्ट कामगिरी पाहिली आहे. सन १९५२ च्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या विकेटसाठी १०९ धावांची विक्रमी भागीदारी केली होती - हा विक्रम आजही कायम आहे. सन १९६५ मध्ये, एस. वेंकटराघवन यांनी त्यांच्या पदार्पणाच्या मालिकेत संपूर्ण न्यूझीलंड संघाला बाद केले, ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ बळी घेतले. सन १९६९-७० मध्ये, बेदी आणि प्रसन्ना यांनी मिळून भारताला ऑस्ट्रेलियावर सात विकेटनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला, दोघांनी एकत्रितपणे १८ बळी घेतले.
इंग्लंडच्या जॉन लिव्हरने सन १९७६ मध्ये कोटलामध्ये संस्मरणीय पदार्पण केले, त्या सामन्यात त्याने अर्धशतक आणि ७० धावांत १० बळी घेतले. पाच वर्षांनंतर, जेफ बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम मोडला. सन १९८३-८४ मध्ये, सुनील गावस्कर यांनी त्यांचे २९ वे शतक येथेच झळकावून डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या दीर्घकालीन विक्रमाची बरोबरी केली. सन २००५-०६ मध्ये, त्याच मैदानावर, सचिन तेंडुलकरने गावस्कर यांचा ३५ वे कसोटी शतक झळकावून सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला.
भारतीय संघाची दिल्लीतील कसोटी कामगिरी अशी आहे. पहिला कसोटी सामना: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, १०-१४ नोव्हेंबर १९४८ रोजी खेळले. सर्वाधिक धावसंख्या ६१३ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ ऑक्टोबर २००८ रोजी केल्या. सर्वात कमी धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, एका डावात ७५ धावा, २५ नोव्हेंबर १९८७ रोजी केल्या होत्या. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध, २ डिसेंबर २०१७ रोजी वैयक्तिक सर्वाधिक २४३ धावा केल्या.
दिलीप वेंगसरकर (६७३ धावा) यांनी येथे सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्यानंतर सुनील गावस्कर (६६८ धावा) आणि सचिन तेंडुलकर (६४३ धावा) यांचा क्रमांक लागतो. अनिल कुंबळे (५८ बळी) यांनी येथे सर्वाधिक बळी घेतले आहेत, त्यानंतर आर. अश्विन (३३ बळी) आणि कपिल देव (३२ बळी) यांचा क्रमांक लागतो.
भारतीय संघाने दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ३५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने १४ सामने जिंकले आहेत आणि १५ सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने दिल्लीत ६ कसोटी सामने गमावले आहेत. अरुण जेटली स्टेडियमवर भारताने शेवटचा कसोटी सामना सन १९८७ मध्ये गमावला होता. या कसोटी सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. कॅरेबियन संघाने भारताविरुद्ध २७६ धावांचे लक्ष्य गाठले. आश्चर्याची बाब म्हणजे भारताचा सध्याचा कसोटी कर्णधार शुभमन गिल त्यावेळी जन्मालाही आला नव्हता. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी झाला आहे.
अशा सर्व परिस्थितीत टिम इंडियाची परिस्थिती भक्कम तर आहेच शिवाय संघातील प्रत्येक जण फॉर्मात आहे. त्यामुळे टिम इंडियासाठी हे मैदान पुन्हा एकदा लाभदायक ठरणार असेच लक्षणे सध्या तरी दिसतात.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.