● स्थानिकसाठी दादांच्या राष्ट्रवादीचा 'गो लोकल'चा फॉर्मुला, दुसऱ्या दिवशी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी मॅरेथॉन बैठका
● प्रत्येक जिल्ह्यावर बारीक लक्ष, स्थानिकसाठी दादा ॲक्शन मोडवर
मुंबई, ४ नोव्हेंबर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठकींचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. वरळीतील एनएससीआय डोम येथे आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक पार पडली.
आज पार पडलेल्या बैठकीसाठी धुळे (शहर-ग्रामीण) नंदुरबार, रायगड (शहर-ग्रामीण), कोल्हापूर (शहर-ग्रामीण), नाशिक (शहर-ग्रामीण), आणि अहमदनगर (शहर-ग्रामीण )जिल्ह्यातील नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काल देखील अशाच प्रकारची बैठक मराठवाड्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत आयोजित करण्यात आली होती.
विविध विभागातील जिल्हा आणि तालुकास्तरावर पक्ष संघटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणे, पक्षासमोरील आव्हाने ओळखणे आणि स्थानिक आणि राज्यस्तरावरील नेतृत्वामध्ये आणखी समन्वय मजबूत करणे हा या बैठकांमागील प्रमुख हेतू आहे.
"ग्राउंड वर उतरून काम करा, लोकांना भेटा, संपर्क तयार करा, स्थानिक पातळीवर स्वतः रणनीती तयार करा यासोबतच सतर्क आणि सक्रिय राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांशी जोडला जाईल याची खात्री करा अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
"नागरिक आता हुशार झाले आहेत, जात किंवा युती न बघता उमेदवार बघून त्याला मतदान करतात. वोट चोरी झाल्याचं खोटं नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहेत कारण त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही" असे देखील विधान अजित पवार यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना सुनील तटकरे म्हणाले, “कॉंग्रेसचा प्रभाव कमी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ते रिक्त स्थान भरून काढण्याची ताकद व विश्वासार्हता आहे. आज गरज आहे की आपण थेट मतदारांच्या संपर्कात जाऊन त्यांचा आवाज बनला पाहिजे. सरकारचा भाग होण्याचा आपला निर्णय जनता अनुभवते आहे, कारण प्रत्यक्ष विकासाच्या कामांतून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळत आहे. आपण या सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवायला हव्या.”
या जिल्हास्तरीय बैठकींमागचा उद्देश केवळ समन्वय नव्हे, तर प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव, एकजूट आणि ठोस संघटनात्मक निर्णय प्रक्रिया निर्माण करणे हा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा संघटनाच्या मुळाशी परत जात असून, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणणे आणि प्रगत मूल्यांवर आधारित सर्वसमावेशक विकासाच्या वचनबद्धतेला नवीन ऊर्जा मिळवून देणे, यावर पक्षाचा भर राहणार आहे. कोकणपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत, या बैठकींमुळे पक्षात नवचैतन्य आणि एकसंधतेची नवी शक्ती निर्माण होत आहे.

