प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२५/२०२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ आज, सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर यांच्या शुभहस्ते मोळी टाकून या महत्त्वपूर्ण हंगामाला सुरुवात झाली.
हा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या जीवनात नवसंजीवनी घडवून आणणारी वास्तू आहे. ही वास्तू टिकावी यासाठी चेअरमन मा. रमेशराव आडसकर यांनी राजकारण बाजूला ठेवून कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. चांगले सहकारी सोबत घेऊन त्यांनी हा कारखाना पूर्व रूपात आणला असून, शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती पुन्हा उभी केली आहे.
इतर कारखान्यांपेक्षा अधिक भाव देण्याची घोषणा:
यावेळी बोलताना चेअरमन मा. रमेश आडसकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा. त्यांनी ठामपणे सांगितले की, "आपण जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेतच नव्हे, तर एक रुपया तरी अधिकचा दर देऊ!" त्यांनी रात्रंदिवस एक करून कारखाना पूर्व स्वरूपात आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. दत्ताअबा पाटील यांनीही उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी संचालक, गंगामाऊली शुगर केजचे व्हाईस चेअरमन श्री. हनुमंतकाका मोरे, श्री. अंकुश इंगळे,श्री. वसंतराव चव्हाणसर, श्री. दिलीपअबा गुळभिले, अंबेजोगाईचे मा. उपनगराध्यक्ष श्री. लोमटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील मोठ्या संख्येने सभासद बांधव , शेतकरी बांधव यांनी उपस्थित राहून या शुभारंभाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.


