वाळकी प्रतिनिधी :- नवा लॅपटॉप आणि प्रिंटर मिळण्यासाठी वारंवार विनंती करूनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यातील १५ हजार तलाठ्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सोमवार (ता. १५) पासून हे सर्व तलाठी ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून, ई-पीकपाहणी, डिजिटल सातबारा, ई-फेरफारसह सर्व संगणकीय प्रक्रिया रखडणार आहेत.
गावपातळीवरील महसुली कामकाजाची प्रमुख जबाबदारी असलेल्या तलाठ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. सातबारा नोंदणी, फेरफार, डिजिटल सातबारा, ई-पीक पाहणी, नुकसानीचे पंचनामे, विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेक आघाड्यांवर तलाठी एकाचवेळी काम करतात. मात्र, त्यांच्या हातातील साधने जीर्णावस्थेत आहेत. आठ ते दहा वर्षांपूर्वीचे लॅपटॉप, वारंवार सर्व्हर न मिळणे, प्रिंटरअभावी प्रतींचे वितरण न होणे अशा अडचणींमुळे कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. तलाठी संघाच्या निवेदनात नवीन लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध होईपर्यंत ऑनलाइन कामबंदीचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला आहे. परिणामी गावापासून शहरापर्यंतचे महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
- महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी नाशिक विभागीय अध्यक्ष श्री गणेश जाधव, राज्य उपाध्यक्ष श्री संतोष तनपुरे जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत हासे, सरचिटणीस श्री महेश सुद्रिक , कार्याध्यक्ष श्री सोपान गायकवाड निवेदन देताना..

