तळई (ता. एरंडोल) येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. शंकरराव धनाजी पाटील यांचा ७५ वा अमृत महोत्सव अत्यंत भावनिक आणि सुसंस्कृत वातावरणात साजरा झाला. हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता, वडील–कन्या नात्यातील प्रेम, ऋणभावना आणि संस्कारांची जिवंत साक्ष ठरला.
मानस कन्या सौ. वैशाली हेमंत पाटील व जावई प्रा. डॉ. हेमंत मधुकर पाटील यांनी पित्याचा अमृतमहोत्सव नतमस्तक भावनेने साजरा करत कृतज्ञतेचा आदर्श ठेवला. गावातून निघालेल्या मिरवणुकीतून पाटील यांनी आयुष्यभर पेरलेल्या शैक्षणिक संस्कारांचे दर्शन घडले. मान्यवरांनी त्यांच्या साधेपणा, शिस्तप्रियता व निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव केला.
कार्यक्रमात पत्नी नीलम पाटील, कुटुंबीय, नातलग व तीन पिढ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी सौ. वैशाली पाटील, प्रा. डॉ. हेमंत पाटील, पुतणी सविता पाटील तसेच नातवंडांनी भावनिक मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थान आनंदराव पाटील यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन शिक्षक शशिकांत पवार यांनी केले. गावपंगतीसह हा अमृत महोत्सव सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.


