श्रीरामपूर, प्रतिनिधी : श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंगचे मालक आकाश चंद्रशेखर (शेखर) वेंकटरमन दुबैया (वय ३४) यांची हॉटेलमध्येच झालेल्या क्रूर हल्ल्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही व्यक्ती हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर आकाश दुबैया यांच्यावर हॉटेलमधील जड वस्तूंनी मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले आहे.
०००

