*जि. प. प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ शाळेत ‘आनंददायी शनिवार’ उत्साहात संपन्न*
*विविध कृतीआधारित उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास*
इंदापूर काळेवाडी, ता. इंदापूर (वार्ताहर) : जि. प. प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे महाराष्ट्र शासनाच्या आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर शाळेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपक्रमाची सुरुवात प्रार्थना व प्रेरणादायी विचारांनी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी योगासने, मैदानी खेळ, लेझीम, चित्रकला, हस्तकला, कथाकथन, वाचनकट्टा, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञानातील सोपे प्रयोग, गणितीय खेळ, इंग्रजी संभाषण, समूहचर्चा तसेच स्वच्छता व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता आणि नेतृत्वगुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
शिक्षकांनी "खेळता-खेळता शिकूया, अनुभवातून घडूया" या संकल्पनेवर आधारित अध्यापन करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, सर्जनशीलता, संघभावना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रताप शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली व उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांच्या कल्पकतेतुन उपक्रमांचे प्रभावी नियोजन केले. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

