कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांनी हात करताच गाड्यांचा ताफा थांबून केले त्यांच्याशी हितगुज.
इंदापूर: 'शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
राज्य शासन शेतकरी हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. शेती आणि शेतकरी सक्षम झाले तरच राज्याचा विकास अधिक वेगाने होईल. असे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोणी देवकर येथे ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांनी दौऱ्यावर असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गाडीला हात केला असता भरणे यांनी तत्परता दाखवून या नागरिकांशी संवाद साधला यावेळी भरणे यांनी नागरिकांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले.
राज्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळणारे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना लोणी देवकर येथे एक भावनिक प्रसंग घडून आला. गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधवांनी प्रेमाने हात करून त्यांचा वाहनांचा ताफा थांबवला आणि राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल समाधान व्यक्त करत कृषिमंत्र्यांचे आभार मानले.
गावातील वृद्ध नागरिकांनीही कृषिमंत्र्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत विविध प्रश्न मांडले.
प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची त्यांची शैली उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरली. 'मोठे पद मिळाले तरी आपल्या माणसांशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही,' अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
--------------
लोणी देवकरमध्ये शेतकऱ्यांनी प्रेमाने थांबवला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा
राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देण्यासाठी पीक विमा, कर्जमाफी, सिंचन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून त्याच्या प्रगतीसाठी शासनाची बांधिलकी कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोणी देवकर येथे शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यक्त केलेला विश्वास हा केवळ एका योजनेचा गौरव नसून शासन आणि शेतकरी यांच्यात निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
------------
राज्यातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे कृषी खाते सांभाळण्याची जबाबदारी असतानाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदाचा कोणताही बडेजाव न मिरवता सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये सहजपणे मिसळण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या कार्यशैलीत
औपचारिकतेपेक्षा आत्मीयता आणि संवादाला अधिक महत्त्व असल्याने राज्यभरातील शेतकरी त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधताना दिसतात. लोणी देवकर येथील प्रसंगानेही त्यांच्या याच साधेपणाची आणि लोकाभिमुख नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

